www.24taas.com, कॅलिफोर्निया
अॅपल विरुद्ध सॅमसंग सॉफ्टवेअर चोरीच्या खटल्यात अॅपलनं बाजी मारलीय. सॉफ्टवेअर चोरी केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानं सॅमसंगला तब्बल एक अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे साडेपाच हजार कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे. या निर्णयामुळे सॅमसंगला मात्र चांगलाच झटका बसलाय.
ऍपल कंपनीचे पेटंट चोरून स्मार्टफोन बनवल्याबद्दल अमेरिकेतील न्यायालयाने हा सॅमसंगला ही शिक्षा सुनावलीय. अमेरिकेतील खटल्याचा निकाल लागला असला तरी ब्रिटन, दक्षिण कोरिया, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियातील न्यायालयांमध्ये अजूनही याच मुद्द्यावर खटले सुरू आहेत. जगातील सर्वात श्रीमंत कंपनी म्हणून ‘अॅपल’ ओळखली जाते. कोरियाच्या ‘सॅमसंग’ या कंपनीनं आयपॅड आणि आयफोन या अॅपलच्या दोन उत्पादनांची परवानगी न घेता कॉपी केल्याचा अॅपलचा दावा होता. अॅपलची ही उत्पादनं अमेरिकन कायद्यानुसार पेटंट घेऊन बाजारात आणण्यात आली आहेत. त्यामुळे सॅमसंगनं पेटंटं कायद्याचं उल्लघंन केल्याचं, कॅलिफोर्नियातल्या सॅन होजे कोर्टानं म्हटलंय.
सॅमसंग आणि अॅपल या दोन्हीही कंपन्यांनी परस्परविरोधी खटले दाखल केले होते. मात्र, यामध्ये सॅमसंगला दोषी मानून ९ सदस्यांच्या खंडपीठाने सॅमसंगवर एक अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावलाय.