www.24taas.com, पीटीआय, पॅरिस
आतापर्यंत लोकसंख्येत प्रथम क्रमांकावर असेल्या चीनला मागे टाकत २०५० साली देशाची लोकसंख्या १६० कोटींवर पोहोचेल आणि भारत लोकसंख्येत जगात नंबर १ होईल असं एका सर्व्हेक्षणात पुढं आलंय.
‘फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ डेमोग्राफिक स्टडीज’नं एक सर्व्हेक्षण केलंय. आपल्या अहवालात त्यांनी म्हटलं की जगातील बहुतेक देशांची लोकसंख्या सातत्यानं वाढतेय. लोकसंख्येचा आकडा २०५०पर्यंत सध्याच्या ७ अब्ज १० कोटींवरून ९ अब्ज ७० कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे, त्यात भारत नंबर १ होण्याची शक्यता आहे.
सध्या चीन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असून, त्याची लोकसंख्या १.३ अब्ज आहे. त्याखालोखाल दुसरा क्रमांक भारताचा असून, त्याची लोकसंख्या १.२ अब्ज आहे. अमेरिका (३१.६२ कोटी), इंडोनेशिया (२४.५ कोटी), ब्राझील (१९.५५ कोटी) याप्रमाणं इतर देशांची लोकसंख्येतील क्रमवारी आहे. फ्रेंच इन्स्टिटय़ूट ऑफ डेमोग्राफिक स्टडीज या संस्थेचे हे ताजे अंदाज जागतिक बँक व संयुक्त राष्ट्रे यांनी लोकसंख्या वाढीबाबत केलेल्या अंदाजाशी जुळणारे असेच आहेत.
जूनमध्ये संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या अंदाजानुसार २०५०मध्ये जागतिक लोकसंख्या ९.६ अब्ज होण्याचा अंदाज आहे. गेल्या दोनशे वर्षांत जगाची लोकसंख्या सातपट वाढली असून, ती २१व्या शतकाच्या अखेरीस १० ते ११ अब्ज होण्याची शक्यता आहे, असं फ्रेंच संस्थेचे संशोधक हिलीस पायसन यांनी सांगितलं.
या अहवालानुसार २०५०पर्यंत इतर देशांची लोकसंख्या अंदाजे खालीलप्रमाणे असेल-
नायजेरिया ४४.४ कोटी, अमेरिका ४० कोटी, इंडोनशिया ३६.६ कोटी, पाकिस्तान ३६.३ कोटी, ब्राझील २२.७ कोटी, बांगलादेश २०.२ कोटी, काँगो १८.२ कोटी, इथिओपिया १७.८ कोटी, फिलिपीन्स १५.२ कोटी, मेक्सिको १५ कोटी, रशिया १३.२ कोटी, टांझानिया १२.९ कोटी, इजिप्त १२.६ कोटी, युगांडा ११.४ कोटी, व्हिएतनाम १०.९ कोटी, इराण ९.९ कोटी. जपान ९.७ कोटी, केनिया ९.७ कोटी, टर्की ९.३ कोटी, इराक ८.३ कोटी, इंग्लंड ७.९ कोटी, जर्मनी ७.६ कोटी, फ्रान्स ७.२ कोटी, सुदान ६.९ कोटी, नायजर ६.६ कोटी, दक्षिण आफ्रिका ६.४ कोटी, मोझांबिक ६.३ कोटी, कोलंबिया ६.३ कोटी.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.