पाकिस्तानात सुरूय स्पेशल ‘कसाब क्लास’!

पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबवर धडे दिले जात असल्याची माहिती उघड झाली आहे. यात कसाबनं दहशतवादी हल्ल्यांमध्ये केलेल्या चुका दाखवल्या जात असून या चूका कशा टाळता येतील यावर माहिती दिली जात आहे.

PTI | Updated: Jul 6, 2014, 10:33 PM IST
पाकिस्तानात सुरूय स्पेशल ‘कसाब क्लास’! title=

नवी दिल्ली: पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबवर धडे दिले जात असल्याची माहिती उघड झाली आहे. यात कसाबनं दहशतवादी हल्ल्यांमध्ये केलेल्या चुका दाखवल्या जात असून या चूका कशा टाळता येतील यावर माहिती दिली जात आहे.

काही दिवसांपूर्वी जम्मू - काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू हनझल्ला उर्फ मोहम्मद नावीद जत याला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अटक केली होती. चौकशी दरम्यान जतनं पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्रांविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती उघड केली आहे. जतनं पाकिस्तानमधील मुलतान इथं दहशतवादी प्रशिक्षण घेतलं. पाकमध्ये प्रशिक्षण घेत असताना मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या अजमल कसाबची भेट झाली होती.

मुंबई हल्लाच्या वर्षभरापूर्वी कसाबला भेटलो होतो असं जतनं भारतीय अधिकाऱ्यांना सांगितलं. मुंबई हल्ल्यानंतर २००९ पासून पाकच्या दहशतवादी केंद्रांमध्ये कसाबचे धडे सुरु झाले. २००९ मध्ये दौरा ए सुफा मक्सर संघटनेच्या अक्सर कॅम्प इथं कसाबच्या चुकांवर आधारित एक व्हिडिओ प्रशिक्षणार्थी दहशतवाद्यांना दाखवण्यात आला होता. यात कसाबनं मुंबई हल्ल्यात केलेल्या चुकांचा समावेश होता. मुंबई गाठण्यासाठी वापरलेली बोट नष्ट करणं, सॅटेलाईट फोनवरुन खऱ्या नावानं संभाषण करणं, नागरिकांना बंधक न बनवण्यात आलेलं अपयश आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकणं या चूकांचा व्हिडिओत समावेश होता असा धक्कादायक खुलासा जतनं केलाय.

दहशतवादी धडे घेतल्यावर जत २०१२मध्ये जम्मूतील केरन इथून भारतात आला होता. जम्मूतील पोलीस अधिकाऱ्यांची हत्या, सुरक्षा दलाच्या कॅम्पवर हल्ला या प्रकरणांमध्ये जतचा समावेश होता. जतनं दिलेल्या या माहितीवरुन पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्रांविषयीची महत्त्वपूर्ण भारताच्या हाती आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.