www.24taas.com, लंडन
१९८४ साली सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी योजलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारचं नेतृत्व करणारे सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल के. एस. बराड यांच्यावर रविवारी रात्री लंडनमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये बराड हे गंभीर जखमी झालेत. एका घरगुती समारंभामध्ये सहभागी झाल्यानंतर ७८ वर्षीय बराड आपल्या पत्नीसोबत आपल्या हॉटेलवर परतत होते.
‘ऑपरेशन ब्लू स्टारमधील माझ्या सहभागामुळेच खलिस्तानी समर्थकांनी मला ठार मारण्याच्या उद्देशानंच माझ्यावर जीवघेणा हल्ला केलाय. मला याआधीही इंटरनेटवरून अनेक धमक्यांचे मेल मिळत होते. यामध्ये, ‘तुझ्यावर हल्ल्यांचे अनेक प्रयत्न केले गेले, पण ते यशस्वी झाले नाहीत, पुढचा हल्ला यशस्वी होईल असं लिहिलं होतं. ते आमचा नेहमीच पाठलाग करत होते’ असं के. एस. बराड यांनी म्हटलंय. रविवारी रात्री बराड यांच्यावर चार दाढीधारी व्यक्तींनी चाकूनं हल्ला केला. यामध्ये त्यांच्या गळ्याला आणि पोटाला जखमी झालीय. लंडनमधल्या एका हॉस्पीटलमध्ये उपचार घेतल्यानंतर ते सध्या आराम करत आहेत. बराड यांच्या झेड दर्जाची सुरक्षा मिळालेली आहे. आज ते भारतात परतणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, परदेश मंत्री एस. एम. कृष्णा यांनी भारतीय उच्चायुक्त जे. भगवती यांच्याकडून जनरल बराड यांच्या प्रकृतीची माहिती घेतलीय. एस एम कृष्णा सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत.
१९८४ मध्ये सुवर्ण मंदिरात घुसून बसलेल्या खलिस्तानी दहशतवादी आणि जनरल सिंह भिंडरावाले याला बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ची तयार करण्यात आलं होतं. शीख पंथीयांसाठी स्वतंत्र खलिस्तानची मागणी हे दहशतवादी करत होते. यावेळी सेनाप्रमुख म्हणून भूमिका बजावणाऱ्या जनरल ए. एस. वैद्य यांची १९८६ मध्ये पुण्यात गोळी मारून हत्या करण्यात आली होती. तसंच यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे बराड हेही वेगवगळ्या दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर होते.