www.24taas.com, वृत्तसंस्था, ब्रिस्बेन
विमानात सिगरेट पिणं आपल्याला इतकं महाग पडू शकतं, याचा जर्मनीतील मथियास जॉर्ग यानं कधी विचारही केला नसेल... पण,
५४ वर्षीय मथियास जॉर्ग हे सिंगापूर ते ब्रिस्बेन जाणाऱ्या विमानात बसले. विमानात मथियास जॉर्ग यांना सिगरेट पिण्याची तल्लप लागली आणि त्यांनी विमानातच सिगरेट पेटवण्याचा प्रयत्न केला. साडे सात तासाच्या या प्रवासात जॉर्ग यांनी अनेक वेळा विमानात सिगारेट पिण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, विमानातील केबिन क्रू अधिकाऱ्यांनी त्यांना सिगारेट पिण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा, जॉर्ग यांनी क्रू अधिकाऱ्यांशी जोरदार भांडणही केलं. त्यानंतर विमानातील केबिन क्रू अधिकाऱ्यांनी पूर्ण प्रवासात जॉर्ग यांचे हात-पाय बांधून ठेवले. विमान ब्रिस्बेन पोचल्यानंतर जॉर्ग यांना पोलिसाच्या ताब्यात देण्यात आलं तसेच त्यांना न्यायालयात हजर व्हावं लागलं.
न्यायालयात विमानात सिगरेट पिणे, विमानातील कॅबिन क्रू अधिकाऱ्याला मारहाण करणे आणि कॅबिन क्रूला ड्यूटीच्या वेळी अडथळा निर्माण करणे... असे आरोप मथियास जॉर्ग यांच्यावर लावण्यात आले.
विमानात केबिन क्रुसोबत झालेल्या हाणामारीत आपणही जखमी झाल्याचं जॉर्ग यांचं म्हणणं होतं... पण, जॉर्ग यांना जामिनच्या बदल्यात त्यांचा पासपोर्ट ऑस्ट्रेलियातील पोलीस अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले तसंच त्यांना ऑस्ट्रेलियामधून बाहेर जाण्यासही बंदी घालण्यात आलीय.
न्यायालयाच्या या आदेशालाही जॉर्ग यांनी पहिले विरोध दर्शवला. मात्र, नंतर जॉर्ग यांनी आपला पासपोर्ट पोलिसांना सोपविला. ब्रिस्बेनच्या न्यायालयात १० जानेवारीला मथियास जॉर्ग यांना परत बोलवण्यात आलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.