www.24taas.com, झी मीडिया, जम्मू
पाकिस्ताननं गेल्या दोन दिवसांत सलग पाचव्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. मुजोर पाकिस्तानी सैन्यानं रविवारी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या सीमेवर तसंच पूँछ भागातील बालकोट-मेंढरमध्ये गोळीबार केला. या हल्ल्यात बीएसएफचा एक जवान गंभीर जखमी झालाय.
ताज्या घडलेल्या धुमश्चक्रीत जवान पवन कुमार शर्मा यांच्या छातीत गोळी लागलीय तसंच पाठिच्या मणक्याला झालेल्या दुखापतीमुळे त्यांचा पायही अधू झालाय. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलंय. दरम्यान, पाक सैन्यानं ५ ऑगस्ट रोजी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बीएसएफचा हेड कॉन्स्टेबल रामनिवास मीना यांचा मृत्यू झालाय. गेल्या सोमवारी जम्मू इथल्या सांबा इथं पाक सैन्यानं सीमारेषेचे नियम तोडून भारतीय जवानांवर गोळीबार केला होता. जखमी अवस्थेत रामनिवास मीना यांना दिल्लीच्या ‘एम्स’ रुग्णालयात भरती करण्यता आलं होतं. तिथंच त्यांचा मृत्यू झाला.
शुक्रवारी रात्रीसुद्धा पाक पाक सैनिकांनी पूँछमध्ये गोळीबार केला होता. यात पाक सैन्यानं सात हजार राऊंड फायर केले होते. त्याआधी पाकनं केलेल्या फायरिंगमध्ये ५ भारतीय जवान शहीद झाले होते.
दरम्यान, या सर्व प्रकारांबाबत भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी यूपीए सरकारवर ताशेरे ओढलेत. पाकिस्तानशी सर्व राजनैतिक संबंध तोडा आणि पाकिस्तानला तोडीसतोड उत्तर द्या, अशी मागणी राजनाथ सिंग यांनी केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.