भारत-पाक सामन्यांस पाकिस्तानी हिंदूंचा विरोध

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने पुन्हा सुरू करण्यावर सुनिल गावस्कर यांच्यासारख्या ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटूंपासून ते अनेक भारतीय नागरिकतांनी विरोध दर्शवला असता, आता पाकिस्तानातील हिंदू कुटुंबांनीही या गोष्टीला विरोध दर्शवला आहे. मात्र, पाकिस्तानी हिंदू देत असलेलं कारण अतिशय उद्विग्न करणारं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 27, 2012, 04:52 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने पुन्हा सुरू करण्यावर सुनिल गावस्कर यांच्यासारख्या ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटूंपासून ते अनेक भारतीय नागरिकतांनी विरोध दर्शवला असता, आता पाकिस्तानातील हिंदू कुटुंबांनीही या गोष्टीला विरोध दर्शवला आहे. मात्र, पाकिस्तानी हिंदू देत असलेलं कारण अतिशय उद्विग्न करणारं आहे.
भारताने सामना जिंकल्यास पाकिस्तानी लोक त्याचा राग स्थानिक हिंदू लोकांवर काढतात. त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली जाते. अशी माहिती पाकिस्तानातील हिंदूंनी भारताला दिली. एवढंच नव्हे, तर ‘तुम्ही पाकिस्तानाशी खेळलात, तर कृपया पराभव पत्करा. कारण तुम्ही जिंकलात, तर आमची काही धडगत नाही’. अशा शब्दात या हिंदूंनी आपली अगतिकता व्यक्त केली. असं भावनिक आवाहन करून भारताला हारायला लावणं हे चुकीचं असलं, तरी पाकिस्तानी हिंदूंची दारूण अवस्था लक्षात घेता, यातील भयावहता जाणवते.
भारत-पाकमधील क्रिकेट खेळाकडे आम्ही निव्वळ खएळ म्हणून पाहात असलो, तरी यातील पराभवासाठी आम्हाला जबाबदार धरून स्थानिक धर्मांध आमचा छळ करतात. अशी कबुली एका हिंदू कुटुंबाने दिली आहे. पाकिस्तान हरला तर आम्हाला नरकयातना भोगाव्या लागतात. त्यामुळे भारतीय खेळाडूंना आमची विनंती आहे की तुम्ही पाकबरोबर क्रिकेट खेळूच नका, अशी कळकळीची विनंती पाकिस्तानातील हिंदू कुटुंबांनी केली आहे. बीसीसीआय यावर काय प्रतिक्रिया देते, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.