www.24taas.com, न्यू जर्सी
'सॅंडी' चक्रीवादळाने अमेरिकेत हाहाकार माजवला आहे. १४४ किलोमीटर प्रतितास वेगाने धडकणारे हे वादळ काल आठ वाजता न्यूजर्सीच्या किना-यावर येऊन धडकले. यामुळे येथील १५ लाख घरांची वीज गायब झाली आहे. तसेच संपूर्ण शहर अंधारात बुडाले आहे. अमेरिकेतील इतर शहरांतील स्थिती गंभीर असून, सुमारे १४ हजार विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. न्यूयॉर्क प्रशासनाच्या माहितीनुसार, या वादळामुळे आतापर्यंत १३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
वादळाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकी प्रशासनानं कंबर कसली आहे. किनारपट्टी भाग रिकामा करुन घेण्यात आलाय. पूर्वोत्तर भागातील ६००० विमानांची उड्डाणं रद्द केली आहेत. एकट्या न्यूयॉर्क शहरातील ३,७०,००० लोकांना हलवण्यात आलं आहे. कोलंबिया, मॅसेच्युसॅट भागांमध्ये ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आलाय. वाहतूकही कालपासून बंद ठेवण्यात आली आहे. वादळाच्या तडाख्यात कमीत कमी जीवित आणि वित्तहानी होईल या दृष्टीकोनातून उपाययोजना सुरु आहेत.
पूर्वेकडील १२ राज्यांतील किना-यालगत आणबाणी घोषित करण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे सुमारे ६ कोटी लोक बेघर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किना-यालगतच्या शहरातील अनेक लोकांना घराच्या बाहेर काढण्यात येत असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.