मुंबई : रसिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवत असलेला महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट हा चित्रपट २२ जानेवारीला पुन्हा प्रदर्शित होतोय.
या चित्रपटात एक नवा सात मिनिटांच्या सीनचा समावेश करण्यात आला आहे. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्यातील संवादाचा हा सीन आहे. चित्रपटातीस मध्यांतरानंतर हा सीन दाखवण्यात येईल. पायरसी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.
मराठी चित्रपटसृष्टीत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नवीन सीन टाकून पुन्हा प्रदर्शित करण्याची ही पहिलीच वेळ असावी. नव्या वर्षाच्या मुहूर्तावर म्हणजेच १ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित कऱण्यात आला होता. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने जोरदार कमाईचा गल्ला जमवण्यास सुरुवात केली होती.
नाना पाटेकर, विक्रम गोखले या दिग्गजांचा जबरदस्त अभिनय आणि उत्कृष्ट कथामुळे पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.