ज्येष्ठ विनोदी अभिनेते देवेन वर्मा यांचं निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते देवेन वर्मा यांचं आज पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते.

Updated: Dec 2, 2014, 10:49 AM IST
ज्येष्ठ विनोदी अभिनेते देवेन वर्मा यांचं निधन title=

पुणे: ज्येष्ठ विनोदी अभिनेते देवेन वर्मा यांचं आज पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. पुण्यातल्या येरवडा स्मशानभूमित १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

२३ ऑक्टोबर १९३७ मध्ये जन्मलेले देवेन वर्मा यांचं शिक्षण पुणे विद्यापीठातून झालं. महाविद्यालययीन जीवनापासून नाटकांमध्ये सहभागी होणारे देवेन वर्मा हे त्या काळी दिग्गज कलाकारांची मिमीक्री करायचे. उत्तर भारताच्या संस्थेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात देवेन वर्मा एकपात्री प्रयोग सादर करत होते आणि हा प्रयोग बी. आर. चोप्रा यांनी बघितला. यानंतर चोप्रा यांनी देवेन वर्मा यांना धर्मपूत्र या चित्रपटात संधी दिली. 

१९६१ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सपशेल आपटला. चित्रपटातील पदार्पण अपयशी ठरले असले तरी वर्मा यांनी एकपात्री प्रयोग करणं सुरुच ठेवलं होतं. १९६३ साली प्रदर्शित झालेल्या गुमराह या चित्रपटात देवेन वर्मा यांनी अशोक वर्माच्या नोकराची भूमिका केली होती. ही विनोदी भूमिका प्रेक्षकांनाही भावली आणि यानंतर देवेन वर्मांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत गेला. एका वेळी तब्बल १६ चित्रपटांसाठी काम करण्याचं आव्हानही त्यांनी लीलया पार पाडलं होतं. दिग्गज अभिनेते अशोक कुमार यांची कन्या रुपा गांगुली यांच्याशी देवेन वर्मा यांनी विवाह केला. 

अंगूर, चोर के घर चोर, चोरी मेरा काम या चित्रपटांमधील विनोदी भूमिकेसाठी त्यांनी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. गोलमाल, जुदाई, खट्टा मीठा, नास्तिक, चमत्कार, अंदाज अपना अपना, इश्क, दिल तो पागल है, मेरे यार की शादी है या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या होत्या. देवेन वर्मा यांनी १४९ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. दोस्त असावा तर असा या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं.

कोणताही अंगविक्षेप आणि अश्लीलतेचा आधार न घेता दर्जेदार अभिनयाद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणं हे वर्मा यांचे वैशिष्ट्य होतं. त्यांनी स्वतःचा प्रॉडक्शन हाऊस सुरु करत काही चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं होतं. सिनेसृष्टीतून निवृत्ती स्वीकारल्यानंतर ते पुन्हा पुण्यात परतले.

गेल्या काही महिन्यांपासून त्यांना किडनीच्या आजारानंही ग्रासलं होतं. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्यानं देवेन वर्मा यांचं निधन झालं. आज दुपारी येरवडा इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनामुळं सिनसृष्टीतील एका विनोदी पर्वांचा अंत झाला अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.