नवी दिल्ली : तुषार कपूर, आफताब शिवदासानी आणि मंदना करिमी यांचा 'क्या कूल है हम-३' च्या अॅडल्ट कन्टेंटची सर्वत्र चर्चा आहे. आता नुकताच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासंदर्भात नवा वाद समोर आला आहे.
या चित्रपटाच्या कन्टेंटसंदर्भात पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला फटकारले आहे. कोर्ट म्हणाले, जेव्हा सेन्सॉर बोर्डाचे सदस्य स्वतः असे चित्रपट कुटुंबासोबत बसून पाहू शकत नाही. तर तो प्रदर्शित कसा करण्यात आला.
या अॅडल्ट चित्रपटासंदर्भात लुधियानातील एका १५ वर्षीय तरूणीने हायकोर्टात अपील केली आहे. गुरूवारी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार आहे. २२ जानेवारी रोजी झालेल्या या चित्रपटाविरोधात १० वीमध्ये शिकणाऱ्या जान्हवी बहल या विद्यार्थीनीने याचिका दाखल केली आहे. ती म्हणाली माझे वय खूप कमी आहे, पण एनजीओच्या मदतीने मी याचिका केली आहे.
या याचिकेवर बुधवारी हायकोर्टात सुनावणी झाली त्यात सेन्सॉर बोर्डाला फटकारण्यात आले. सेन्सॉर बोर्डातील सदस्य आपल्या कुटुंबासोबत हा चित्रपट पाहू शकत नाही, मग अशा चित्रपटाला कोणी मंजुरी दिली.
कोर्टाच्या या प्रश्नाला उत्तर देताना सेन्सॉर बोर्डाने सांगितले की, या चित्रपटातील एकूण १०७ सीन कट करण्यात आले. त्यानंतर केवळ ३२ सीन आणखी कट करण्यात आले. त्यानंतर या चित्रपटाला ए सर्टिफिकेट देण्यात आले.