नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आता विदर्भातले आमदार सरसावले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी गडकरींनीच मुख्यमंत्री होण्याची मागणी केल्यानंतर विदर्भातल्या आमदारांनीही या मागणीला जोरदार पाठिंबा दिलाय.
नितीन गडकरींनीच मुख्यमंत्री व्हावं, असं वक्तव्य आमदार सुधीर मुनगंटीवारांनी केलंय. त्यानंतर, विदर्भातले ४० हून अधिक आमदार आज दुपारी गडकरींच्या निवासस्थानी दाखल झालेत. त्यांनी गडकरींना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंब जाहीर केलाय. या आमदारांनी आता शक्तीप्रदर्शन सुरू केलं असून 'आपण गडकरींचं मन वळवण्याचाही प्रयत्न करणार' असल्याचं म्हटलंय. याच संबंधी आज रात्री गडकरींच्या निवासस्थानी एका बैठकीचंही आयोजन करण्यात आलंय.
यामुळेच भाजपमधल्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीला एक नवं वळण आलंय तर दुसरीकडं गडकरींच्या समर्थनात विदर्भात एसएमएस आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार कॅम्पेनिंगही सुरू करण्यात आलंय.
भाजपमध्ये आता मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखच सुरु आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायला हवं, अशी थेट मागणी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय. त्याला पक्षातून विशेषत: विदर्भातून वाढता पाठिंबा मिळतोय. कृष्णा खोपडे, चैनसुख संचेती, आशिष देशमुख यांनी सीएमपदासाठी गडकरींना पाठिंबा दिलाय.
उल्लेखनीय म्हणजे, 'झी २४ तास'च्या रोखठोक नितीन गडकरी या कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाबद्दल प्रश्न विचारला असता, आपण दिल्लीत खूश असल्याचं सांगत राज्यात परतण्यात गडकरींनी स्पष्टपणे म्हटलं होतं.
दरम्यान, महाराष्ट्रात भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल मिळाल्यानंतर आज प्रथमच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यात परतले आहेत. त्यांचे नागपूर विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. विदर्भात भाजपनं ऐतिहासिक यश मिळवलंय. त्यामुळं त्यांनी विदर्भातल्या जनतेचे आभार मानले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.