मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले जाहीरनामे, वचननामे आणि दृष्टीपत्रे जाहीर केलीत. महाराष्ट्राचा भविष्यातला चेहरा कसा असेल, याचं प्रतिबिंब खरं तर या जाहीरनाम्यांमध्ये उमटायला हवा होता. पण राजकीय पक्षांना नागरिकांच्या सोयीसुविधांची चिंता कमी आणि पुतळ्यांची जास्त काळजी लागून राहिलीय.
वीज, स्वच्छ पाणी, आरोग्य, शिक्षण, कायदा-सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था आदी नागरी सुविधा सोडवण्यासाठी राजकीय पक्षांनी नेहमीप्रमाणे मोठमोठी आश्वासनं दिलीत... पण या नागरी समस्यांपेक्षा त्यांच्या जाहीरनाम्याची पानंच्या पानं खर्ची पडलीत ती पुतळे उभारणीच्या महत्कार्यासाठी प्रत्येक पक्षाने जणू राष्ट्रपुरूषांची वाटणी करून घेतलीय की काय, अशी शंका यावी, अशी स्थिती आहे.
यंदाच्या निवडणूक प्रचारात शिवछत्रपतींचा मुद्दा गाजतोय. त्यामुळं अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या आश्वासनाशिवाय एकाही राजकीय पक्षाचा जाहीरनामा पूर्ण होऊ शकलेला नाही.
काँग्रेसनं पुन्हा एकदा अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात दिलंय. त्याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, वसंतराव नाईक, अण्णाभाऊ साठे, लहूजी साळवे, संत गाडगे महाराज आणि जीवा महाला यांची स्मारके उभारण्याचा काँग्रेसचा संकल्प आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनंही शिवस्मारकासोबतच बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर यांची स्मारके उभारण्याचा शब्द दिलाय.
विकासाच्या नावानं राजकारण करणा-या भाजपलाही अचानक पुतळा उभारणीचं महत्त्व पटलेलं दिसतंय. भाजपला शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाबाई, क्रांतीवीर लहुजी वस्ताद, उमाजी नाईक, लोकमान्य टिळक, अहिल्याबाई होळकर या राष्ट्रपुरूषांची स्मारके उभी करायची आहेत.
या सगळ्या भाऊगर्दीत शिवसेना तरी कशी मागे राहील? शिवसेनेला सुद्धा शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि संत नामदेव यांची राष्ट्रीय स्मारके उभारायची आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर विविध समाजाची, जातीधर्माची मते खिशात घालण्यासाठी हे पुतळे उभारणीचं कार्ड फेकलं जातं, हे जनतेला पुरतं कळतंय. उद्या याच पुतळ्यांच्या संरक्षणासाठी मोठा फौजफाटा उभा करावा लागणार आहे. पण तरीही राजकारणात जिवंत माणसांपेक्षा पुतळ्यांचं महत्त्व जास्त आहे, हे वास्तव नेत्यांच्या चांगलंच ध्यानात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.