मुंबई : मुंबईतील सर्वात मोठ्ठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी मुख्य लढत होणार असून धारावी पुर्नविकासाच्या मुद्यावर दोन्ही पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
माहिमचा पश्चिम भाग आणि सायनचा पूर्व भाग यामध्ये अस्ताव्यस्त पसरलेली धारावीची वस्ती, धारावी म्हणजे गरीबी, धारावी म्हणजे खुली गटारं, धारावी म्हणजे बकालपणा आणि धारावी म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीचं माहेरघर. अशीच धारावीची ओळख. गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड इथल्या आमदार आहेत. त्यांच्यासमोर आता शिवसेनेच्या बाबुराव मानेंचं आव्हान आहे. या दोघांसह या मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत. इथे मिश्रवस्ती असली तरी मुस्लिम मतं निर्णायक ठरणार आहेत.
गेल्या कित्तेक वर्षांपासून रखडलेला धारावी पुर्नविकास प्रकल्प मतं मिळवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरणार आहे. शिवसेनेचे उमेदवार बाबुराव माने यांनी १५ दिवसांत जीआर काढून धारावी झोपडपट्टीवासीयांना घरं देणार असं आश्वासन दिलंय. या मुद्यावरुनच मुख्य उमेदवारांमध्ये जुंपलीय.
हा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे या जातींची मतं विभागली जातील. पण गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असूनही धारावी पुर्नविकासाचा रखडलेला प्रकल्प याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. भाजपचं कमळ धारावीच्या चिखलात फुलेल असं सध्या तरी चित्र दिसत नाही. याचा सर्वाधिक फायदा शिवसेनेचे उमेदवार बाबुराव माने यांना होऊ शकतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.