उद्धव - राज एकत्र आले तर आनंद - नारायण राणे

शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार अशी चर्चा लोकसभा निवडणुकीपासून आहे. मात्र, एकत्र येण्याची टाळी वाजली नाही. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही चर्चा पुन्हा सुरु झाली. मात्र, राज ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर चर्चा खरी असल्याचे स्पष्ट झाले. 

Updated: Oct 11, 2014, 10:33 AM IST
उद्धव - राज एकत्र आले तर आनंद - नारायण राणे title=

मुंबई : शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार अशी चर्चा लोकसभा निवडणुकीपासून आहे. मात्र, एकत्र येण्याची टाळी वाजली नाही. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही चर्चा पुन्हा सुरु झाली. दोन्ही पक्षातील नेत्यांनी यावर भाष्य केलं होतं. मात्र, राज ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर चर्चा खरी असल्याचे स्पष्ट झाले. जर हे दोघे भाऊ एकत्र येत असतील तर त्याचा नक्कीच आनंद होईल, अशी प्रतिक्रिया एकेकाळचे सेनेचे शिलेदार आणि आताचे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दिली.

राज ठाकरे यांनी एका न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले की, उद्धवने मला फोन केला. भाजपने कसे फसवले ते सांगितले. मी पुढे म्हटले आता काय करायचे? त्यावर उद्धव म्हणाला, चर्चा करु. तीन पर्याय दिले. त्यानुसार पुढे काय होते ते पाहू. मी पुढे आलोय. महाराष्ट्राच्या हितासाठी मी विचार केलाय, असे राज म्हणाले. त्यानंतर शिवसेनेतून स्वागत करण्यात आले. खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भूमिका महाराष्ट्राच्या हिताची आहे. त्यांच्या भूमिकेचे स्वागत असेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यांनतर चर्चा अधिकच होऊ लागली आहे.

उद्धव- राज एकत्र येत असतील ते चांगले आहे. ठाकरे बंधू युतीसाठी एकत्र आले तर आपल्याला निश्चित आनंद होईल असं मत राणे यांनी व्यक्त केले. त्याचवेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही दोघे भाऊ एकत्र आले तर आनंद होईल, असे व्यक्त केलंय. 

शिवेसनेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही यावर  भाष्य करताना म्हटलंय, आमच्याबरोबर कोण येत असेल तर आम्ही त्यांना नक्कीच घेऊन सोबत जाऊ. तर दुसरीकडे राज यांच्या पत्नी सौ. शर्मिला ठाकरे यांनी असं का होऊ शकत नाही. नक्कीच होऊ शकतं, अशी सावध प्रतिक्रिया दिली.

प्रचारासाठी काही दिवसच शिल्लक असताना प्रत्येक पक्ष मतदारान पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिंडोशी मतदार संघात प्रचार केला. त्यावेळी त्यांनी ठाकरे  बंधूबाबत भाष्य केलं. रॅली काढून त्यांनी दिंडोशी मतदार संघातील मतदारांशी संवाद साधला. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी मनसेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.