अकोला : अकोला जिल्ह्यातील 'अकोट विधानसभा मतदारसंघाच्या क्षितिजावर 1990 पर्यंत काँग्रेसचा सूर्य कधी मावळत नव्हता', असं बोललं जायचं... पण, जिल्ह्याच्या राजकीय सारीपटावर भारिप-बहुजन महासंघ-शिवसेनेचा उदय झाला आणि इथली राजकीय समीकरणं बदलली. पाहूयात शिवसेनेचा भगवा घेतलेलेआमदार संजय गावंडे यांनी अकोटमध्ये काय विकास केलाय.
विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -
शिवसेना - संजय गावंडे
भाजप - प्रकाश भारसाकळे
काँग्रेस - महेश गणगणे
राष्ट्रवादी - राजू बोचे
मनसे - प्रदिप गणेशराव गावंडे
अपक्ष - प्रदीप वानखेडे (भारिप)
अकोट विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेचे संजय गावंडे करतायेत. मात्र, अवघ्या 965 मतांनी विजयी झालेल्या गावंडेंसाठी आगामी निवडणूक म्हणजे एक अग्नीपरीक्षाच असेल. अकोट विधानसभा मतदारसंघ म्हणजे अकोला जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावणारा मतदारसंघ.
मतदार संघात एकूण 2 लाख 70 हजार 208 मतदारसंख्या असून या मतदारसंघात अकोट आणि तेल्हारा या दोन तालुक्यांचा समावेश आहे. या मतदारसंघाने 1990 नंतर प्रत्येक निवडणुकीत नव्या चेहऱ्याला संधी दिलीय. महाराष्ट्र निर्मितीनंतर प्रत्येक निवडणुकीत येथून काँग्रेसला ताकद मिळालीयं. पण 1990 नंतर शिवसेना आणि भारिप-बहुजन महासंघाचा उदय झाला अन येथील काँग्रेसची परंपरागत 'वोट बँक' असलेला मराठा आणि दलित समाज या दोन पक्षांमध्ये विखुरला गेला तो अगदी आजपर्यंत.
पाच वर्षांच्या कारकिर्दीत विकासाभिमुख कामांवर भर दिल्याचं गावंडे यांचं म्हणण आहे... यामध्ये
- अकोटसाठी नवीन ग्रामीण पोलिस स्टेशन
- रस्ते दुरूस्तीची कामे
- नवीन रस्त्यांची कामे
- अकोट आणि तेल्हारामध्ये विकासाच्या विविध योजना राबविल्याचे गावंडे सांगतात...
शिवसेनेकडून संजय गावंडे यांनाच तिकीट मिळणार असल्याचे संकेत पक्षप्रमुखांनी दिल्याने गावंडे निश्चिंत झालेत. मात्र या मतदारसंघाचे नेतृत्व केलेल्या गुलाबराव गावंडे यांच्या गटाचा संजय गावंडेंना विरोध असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांचंही नाव समोर येऊ लागलंय. तर काँग्रेस अंतर्गत गटांच्या कुरघोडीच्या राजकारणात विखुरली गेलीये. त्यामुळे इच्छुकांची भलीमोठी रांग तिकीटासाठी लागलीये. जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते अन विलासराव देशमुखांचे कट्टर समर्थक सुधाकर गणगणे यांचा हा पारंपरिक मतदारसंघ... मात्र, गेल्या निवडणुकीत सुधाकर गणगणे यांना शिवसेनेच्या संजय गावंडे यांनी अटीतटीच्या निवडणुकीत पराभवाची धूळ चारली.
सुधाकर गणगणे स्वताला उमेदवारी न मिळाल्यास मुलासाठी इच्छूक आहेत. हिदायत पटेल, माजी राज्यमंत्री रामदास बोडखे, त्यांचा मुलगा माजी नगराध्यक्ष संजय बोडखे हेही स्पर्धेत आहेत. राणेसमर्थक प्रकाश भारसाकळे आता भाजपत दाखल झालेत. तर गणगणे यांचे राजकीय गुरु विलासराव देशमुख यांचे निधन झाल्याने गणगणे यांच्या तिकिटाचे काय होणार? हा प्रश्नही आहेच. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इथून भाजपला 32 हजारांची आघाडी मिळालीय. त्यातच काँग्रेसच्या ताब्यातील या मतदारसंघावर आता राष्ट्रवादीने दावा केलाय.
राजकारणी मंडळींच्या या कुरघोडीच्या राजकारणात सर्वसामान्य माणूस मात्र विकासापासून वर्षानुवर्ष दूरच आहे. मतदारसंघातील महत्वाच्या समस्या आजही आहे तशाच आहेत...
- ग्रामीण भागात रस्त्यांची दूरवस्था
- अपुऱ्या सिंचन सुविधा
- एम.आय.डी.सी.ची दुरवस्था
- उद्योगांचे स्थलांतर
- वाढती बेरोजगारी
- कृषीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग नाही.
- सातपुड्यातील गावांमध्ये कुपोषणाची समस्या
- अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या
अशा विविध समस्यांनी सर्वसामान्य जनता त्रस्त आहे.
थोडक्यात, निवडणूक येते अन जाते... प्रत्येक निवडणुकीत विकासाची स्वप्न इथल्या जनतेला दाखवली जातात. मात्र, निवडणुकीनंतर पुन्हा 'पुढचे पाठ मागचे सपाट अशी परिस्थिती या मतदारसंघात आहे. या निवडणुकीत हा दुर्दैवी फेरा थांबेल का, अन येथील लोकप्रतिनिधींच्या विकास संवेदना जागृत होतील का?, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणारी ही आगामी निवडणूक आहे. आणि म्हणूनच जनतेचा मूड काय आहे, जनता यावेळी कुणाला काय धडा शिकवते हे पाहणे औत्सुक्याचे आहे...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.