ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - बोरीवली

2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यानही बोरीवली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस, अशी त्रिशंकू लढत रंगली होती. 

Updated: Oct 7, 2014, 09:36 PM IST
 title=

मुंबई : 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यानही बोरीवली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस, अशी त्रिशंकू लढत रंगली होती. 

बहुभाषिकांचा मतदारसंघ म्हणून बोरिवलीची नव्यानं ओळख बनलीय.बोरीवली विधानसभा मतदारसंघात गोराई, एमएचबी कॉलनी, एक्सर योगीनगर, चिकूवाडी, कोरा केंद्र आणि चारकोप उत्तरचा समावेश होतो.

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - उत्तम अग्रवाल
भाजप - विनोद तावडे
काँग्रेस - अशोक सुत्राळे
राष्ट्रवादी - इंद्रपाल सिंग
मनसे - नयन कदम

या मतदारसंघातून एकूण 3 लाख 14 हजार 220 मतदार आहेत. या मतदारसंघात गुजराती आणि मराठी भाषिकांचं प्राबल्य आहे. महापालिकेचा विचार करता भाजपाचे ४ नगरसेवक आहेत. काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गोपाळ शेट्टी यांचा विजय झाला होता. गोपाळ शेट्टी यांना 68 हजार 926 मते मिळाली होती. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नयन कदम यांना ३८ हजार ६९९ मते मिळाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूषण पाटील यांना 35 हजार 119 मते मिळाली होती. या निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांना 30227 मताधिक्य मिळाले होते. भाजपसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणुन बोरिवली मतदारसंघाकडे पाहिलं जातं. त्यामुळेच विनोद तावडे यांनी या मतदारसंघाची निवड केलीय.

बोरीवली मतदारसंघात आपण केलेल्या कामांच्या आधारे बोरिवलीकर भाजपच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील, असा विश्वास गोपाळ शेट्टी यांना वाटतो. सुंदर,सुसज्ज उद्याने, महिला भवनची उभारणी, महिलांना रोजगारास प्राधान्य, रुग्णांसाठी सवलतीच्या दरात उपचार, अंतर्गत रस्तेदुरूस्ती अशी विविध विकासकामे केल्याचा दावा गोपाळ शेट्टी यांनी केलाय. खासदार साहेबांना विकासकामे केल्याचा दावा केला असला तरी इथे अनेक समस्या वर्षानुवर्ष तशाच आहेत. 

वाहतूक कोंडीची समस्या, रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष, अरुंद रस्ते, झोपडपट्टीवासियांच्या समस्यांकडे दुर्लक्ष अशा अनेक समस्यांमुळे आमदारांच्या कामावर स्थानिकानी संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्यात. गोपाळ शेट्टी यांच्या विकासकामांवर त्यांच्या विरोधकांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

गोपाळ शेट्टी यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर विनोद तावडे बोरीवलीत पुन्हा जिंकून येईल हा गोपाळ शेट्टींचा विश्वास किती खरा ठरतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.