ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - घाटकोपर पश्चिम

गेल्या वेळी राम कदम विरुद्ध पूनम महाजन असा सामना रंगला होता. पूनम महाजन आता खासदार झाल्यात. तर राम कदम यांनी भाजपमध्ये उडी घेतलीय.  

Updated: Oct 7, 2014, 09:36 PM IST
 title=

मुंबई : गेल्या वेळी राम कदम विरुद्ध पूनम महाजन असा सामना रंगला होता. पूनम महाजन आता खासदार झाल्यात. तर राम कदम यांनी भाजपमध्ये उडी घेतलीय.  

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -       
शिवसेना - सुधीर मोरे
भाजप - राम कदम
काँग्रेस - रामगोविंद यादव
राष्ट्रवादी - हारूण खान
मनसे - दिलीप लांडे

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदार संघ २००९ च्या पुनर्रचनेत कुर्ला विधानसभा मतदारसंघाच्या विभाजनातून हा मतदारसंघ तयार झाला.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात असलेया या अस्सल मराठमोळ्या विधानसभा मतदारसंघात सुमारे 80 टक्के मराठी मतदारांचं प्राबल्य आहे. एकूण महापालिकेच्या सहा प्रभाघांपैकी शिवसेनेचे दोन नगरसेवक, राष्ट्रवादीचे दोन, भाजपा आणि मनसेचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे. 

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेच्या तिकीटावर राम कदम यांना ६०,३४३ मते मिळाली, तर भाजपच्या पुनम महाजन यांना ३४, ११५ मतांवर समाधान मानावं लागलं. या लक्षवेधी मतदारसंघात राम कदम यांनी बाजी मारली होती.

गेल्या पाच वर्षात अनेक विकासकामे केल्याचा दावा राम कदम यांनी केलाय. ठिकठिकाणी बोअरवेल खोदण्याचं काम, संरक्षण भिंती उभारल्या, अबालवृद्धांना काशी यात्रेचं दर्शन अशा कामांतून सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचं नातं जपण्याचं काम केल्याचं राम कदम सांगतात. 

राम कदम विकासकामांचा दावा करत असले तरी डोंगराळ भागात पाणी पुरवठा करण्यासाठीचं फसलेलं नियोजन प्राथमिक नागरी सोयीसुविधांचा अभाव, एलबीएस मार्गाच्या रुंदीकरणाचा गुंडाळलेला प्रस्ताव वाढती वाहतूक कोंडी, अशा समस्या इथे नागरिकांना भेडसावताहेत. आमदारांनी फक्त अध्यात्मिक कामं केली. जनतेच्या खऱ्या समस्यांकडे त्यांनी लक्षच दिलं नसल्याचा आरोप विरोधक करताहेत. सत्तेसाठीची ही कुरघोडी सुरू असतानाच सर्वसामान्य माणसांच्या इथल्या प्रतिक्रिया मात्र अतिशय बोलक्या आहेत.

सध्या या मतदारसंघात फेरबदलाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातले इच्छूक आपली सर्व शक्ती पणाला लावण्यात गर्क आहेत. निवडणुकीचं बिगूल वाजल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-सेना-मनसे असे सगळेच पक्ष तयारीला लागलेत. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.