जळगाव : ३० कोटींची लाच मागणाऱ्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कथित पीएला अटक करण्यात आली आहे. जमीन हस्तांतरणासाठी ठाण्यातील शिक्षण संस्थ्येकडे लाच मागितली. दरम्यान, माझ्या नावाचा गैरवापर केल्याचा दावा खडसेंनी केलाय.
एका जमिनीचं प्रकरण मार्गी लावण्यासाठी ३० कोटी रुपयांची लाच स्वीकारताना गजानन पाटील याला अटक करण्यात आली. आपण महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं पाटीलनं सांगितलं होतं. मात्र आपल्या कार्यालयात अधिकृत अथवा खासगी स्वरुपात गजानन पाटील नावाचा कोणीही कर्मचारी नसल्याचा खुलासा खडसे यांनी केलाय.
ठाणे येथील एका संस्थेला कल्याणमधील जागा मिळवून देण्यासाठी पाटीलनं लाच मागितली होती. यातला १५ कोटींचा पहिला हप्ता घेण्यासाठी पाटील आला असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याला रंगेहाथ अटक केली. पाटील हा मुळाच मु्क्ताईनगरचा राहणारा आहे.
जळगाव जिल्ह्यातल्या गरजू रुग्णांना मुंबईत उपचारासाठी आणत असत. सामाजिक काम करणारी तालुक्यातील व्यक्ती, या नात्यानं आपली आणि पाटील याची ओळख असली तरी तो आपला कर्मचारी नाही, असं खडसेंनी स्पष्ट केलंय. आपल्या नावाचा गैरवापर करत असेल तर त्याच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.