चंद्रपूर : येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या पर्यटकांना मनसोक्त व्याघ्रदर्शन होत आहे. एकाच दिवशी ८ वाघांचे दर्शन झाल्याने पर्यटक हरखून गेले आहेत. मात्र ही व्याघ्रमौज अनुभवताना नियम पाळले जात नसल्याचं समोर येतंय.
जगप्रसिध्द ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सैर करण्याचा अनुभव काही औरच. नैसर्गिक अधिवासात असणारे वाघ आणि इतर वन्यप्राणी न्याहाळणे म्हणजे धम्माल मजा. ताडोबातील पर्यटक भेटीने लाखांचा आकडा ओलांडला आहे. ताडोबाच्या उत्पन्नातही भरघोस वाढ दिसते आहे. जानेवारी ते मे या उन्हाच्या काळात सर्वाधिक वन्यप्राणी पाणवठ्यावर येतात. तेव्हाच हे वन्यप्राणी सर्वाधिक जवळून अनुभवता येतात.
गेली काही वर्षे ताडोबाचे मार्केटिंग उत्तम झाल्याने पर्यटकांची ताडोबात तोबा गर्दी असते. सध्या ताडोबात येणा-या पर्यटकांना वाघांचे मनसोक्त दर्शन होत आहे. मंगळवारी चक्क ८ वाघांचे दर्शन झाले. यातही बोनस म्हणजे ताडोबाच्या पांढरपौनी भागातील तलावात वाघीण आणि बछडे शिकार खात असतानाचे झालेले दर्शन पर्यटकांना लाईफटाईम अनुभव देऊन गेले. हे सर्व घडत असताना ताडोबाच्या या भागात पर्यटकांनी शिस्त पाळली नसल्याचं समोर येतंय. प्रसंगी वाघांच्या भ्रमणाचा मार्ग अडवून पर्यटकांनी आपली हौस भागविल्याचे नजरेस पडत आहे.
ताडोबातील अधिका-यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. काही जिप्सीचालकांना नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. ताडोबात व्याघ्रदर्शनाचा तद्दन बाजार होऊ नये यासाठी ताडोबा व्यवस्थापनाने ककड कारवाई करावी, अशी मागणी होतेय.