मुंबई : सामान्य माणसांमधल्या असामान्यत्वाचा सन्मान म्हणजे 'झी २४ तास अनन्य सन्मान'... यंदाचा अनन्य सन्मान सोहळा परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये संपन्न झाला.
'अनन्य सन्मानाचे मानकरीच खरे सेलिब्रिटी' या शब्दांत पुरस्कर्त्यांचं कौतुक डॉ.सुभाष चंद्रा यांनी केलं... निमित्त होतं 'झी २४ तास'च्या 'अनन्य सन्मान' पुरस्कार सोहळ्याचं... प्रसिद्धीपासून दूर राहून समाजासाठी, लोकांसाठी कार्यरत असणा-या समाजातील अनन्य व्यक्तिमत्वांचा गौरव म्हणजेच 'झी २४ तास'चा अनन्य सन्मान सोहळा... यंदाच्या सोहळ्यातही विविध क्षेत्रात समाजासाठी असामान्य कामगिरी करणाऱ्या विभुतींचा गौरव करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात सेवारत असणाऱ्या मोरेश्वर मोर्शीकर गुरूजींना 'शिक्षण अनन्य सन्मान' प्रदान करण्यात आला. तर कृषी क्षेत्रात तेजराव कन्नर यांना 'कृषी अनन्य सन्मान' प्रदान करण्यात आला. अकाली आलेल्या अपंगात्वर मात करत कन्नर यांनी कोणत्याही बँकेचं कर्ज न घेता आपली शेती सुरु ठेवली, दोन मुलींची लग्न केली आणि कुटुंबाचं पालन पोषण करतायत...
बालनाट्यासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या श्रीनिवास शिंदगी यांना मनोरंजन अनन्य सन्मान प्रदान करण्यात आला. तर एकलव्य धनुर्विद्या अकादमीचे संस्थापक सदानंद जाधव यांना क्रीडा अनन्य सन्मानानं गौरवण्यात आलं. स्वत:च्या जीवाची परवा न करता तीन मुलींचा जीव वाचवणाऱ्या ११ वर्षीय बहाद्दर अमित पवारला 'शौर्य अनन्य सन्मान' प्रदान करण्यात आला. इतकंच नाही तर अमितच्या पुढच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च एस्सल ग्रुप उचलणार असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलं.
रेहाना बैलिम आणि भारती लोळगे यांना समाजसेवा अनन्य सन्मान, डॉ. विवेक भिडे यांना 'पर्यावरण अनन्य सन्मान' देऊन गौरवण्यात आलं... तर वंचित पारधी समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणारे सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एस्सेल ग्रुप चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या हस्ते 'जीवनगौरव सन्मान' प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही 'झी २४ तास'च्या या उपक्रमाचं कौतुक केलं.
या कार्यक्रमाला सरकार आणि विरोधी पक्षातल्या अनेक राजकीय नेते मंडळींबरोबच समाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातीलही अनेक मान्यवर उपस्थित होत. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व अनन्य व्यक्तीमत्वांना एकञ स्टेजवर बोलावून स्टँडिंग ओवेशन देण्यात आलं. या अनन्य सन्मान विजेत्यांना 'झी मीडिया'चा सलाम...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.