पुणे : आगामी महापालिका निवडणुकीत महापौर कुणाचा होणार यावरून रणसंग्राम सुरु झालाय. मात्र त्याचवेळी पुण्यामध्ये विरोधी पक्षनेतापदाची चर्चा रंगलीय. आश्चर्य वाटेल पण हे खरय. मावळत्या महापालिकेत औट घटकेचं विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस - ५४
काँग्रेस - २९
भाजप - २६
शिवसेना- १२
मनसे- २७
आरपीआय - २
पुणे महापालिकेतील अगदी महिनाभरापूर्वीचं असे पक्षीय बलाबल होते. मात्र आता आगामी निवडणुक येऊ घातली तसे सभागृहातील पक्षीय बलाबल डळमळीत होऊ लागले आहे. पक्षांतर्गत इनकमिंग तसेच आऊटगोईंगचा परिणाम सत्ता समिकरणावर होताना दिसतोय. महापालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेसकडे सध्या विरोधी पक्षनेते पद आहे. काँग्रेसचे अरविंद शिंदे हे विरोधी पक्षनेता आहेत.
मात्र नुकतेच त्यांच्या पक्षातील ६ नगरसेवकांनी भाजप तसेच राष्ट्रवादीची वाट धरलीय. त्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ २३ वर येऊन ठेपलंय. अशा परिस्थितीत सभागृहात काँग्रेसपेक्षा जास्त नागरसेवक असलेल्या मनसेनं विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला होता. पण हा दावा अवघ्या २ दिवसात मागं घेण्याची वेळ मनसेवर आली. या दोन दिवसात मनसेच्या ३ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे त्यांचा आकडा २४ वर आलाय.
अशा सगळ्या परिस्थितीत भाजपचं संख्याबळ टिकून असल्यानं आजघडीला तो दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. परिणामी भाजपनं देखील महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितलाय. खरंतर पुणे महापालिकेत काँग्रेस हा सत्ताधारीही आहे आणि विरोधी पक्षही आहे.
राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभागी असताना उपमहापौरपदाबरोबरच विरोधी पक्षनेतेपदही काँग्रेसनं पदरात पाडून घेतलं होते. आता मात्र काँग्रेसचं संख्याबळ घटल्यानं विरोधी पक्षनेते पदाबद्दल महापौर काय निर्णय घेतात याबद्दल उत्सुकता आहे. विरोधी पक्ष नेतेपदावर नवनवीन दावे समोर येत असताना काँग्रेसही मागे हटलेली नाही. विरोधी पक्षांनी निवडणुकीच्या माध्यमातून हवे ते पद मिळवावं असं आव्हानच काँग्रेसतर्फे देण्यात आले आहे.