पुणे: दाभोलकरांच्या हत्येचा तपास चक्क मांत्रिकाच्या मदतीनं करण्यात आला, असा खळबळजनक दावा केलाय, आऊटलूकनं.... एका मांत्रिकाच्या अंगात दाभोलकरांचा आत्मा येत होता आणि त्याच्याशी संवाद साधत तपास करण्यात आला, असा गौप्यस्फोट आऊटलूकनं केलाय.
डॉ. नरेंद्र दाभोलकर... ज्यानं अख्खं आयुष्य अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वेचलं, त्याच्या हत्येचा तपास मांत्रिकाच्या मदतीनं व्हावा, यापेक्षा क्रूर चेष्टा काय असू शकते...
दाभोलकरांच्या हत्येचा तपास माजी सहाय्यक पोलीस आयुक्त अभ्यंकर आणि एका मांत्रिकाच्या मदतीनं करण्यात आल्याचा धक्कादायक दावा आऊटलूकनं केलाय.
ऑगस्टमध्ये दाभोलकरांची हत्या झाल्यावर दोन-तीन महिने झाले होते. हल्लेखोरांचा शोध लागत नसल्यामुळे पुणे पोलिसांवर टीका होत होती... म्हणूनच आयुक्त गुलाबराव पोळ यांनीहा अजब मार्ग निवडला... पोळ यांनी थेट दाभोलकरांच्या आत्म्याशी संवाद साधायचं ठरवलं... त्यासाठी त्यांनी एक 'क्रॅक टीम' तयार केली... दाभोलकरांच्या आत्म्याला बोलावणं आणि तपास करणं... आयुक्त कार्यालयातल्या एका खोलीत हा 'जादूचा खेळ' होत होता...
तिथं मेणबत्त्या लावल्या जायच्या, पाण्याची वाटीठेवली जायची... काही मिनिटांतच 'मांत्रिक' ठाकूरच्या शरिराला
कंप भरायचा... दाभोलकरांचा आत्मा आता ठाकूरच्या शरिरात आल्याची ही खूण असायची... या काळात बाहेर पडलेला ठाकूरचा आत्मा पाण्याच्या वाटीत 'पोहायचा'... मग पोळ 'दाभोलकरां'ना त्यांच्या खुन्यांबाबत प्रश्न
विचारायचे... यातून हाती आलेल्या माहितीच्या आधारे बाकीचे अधिकारी तपास करायचे...
या जादूच्या खेळासाठी मनिष ठाकूर या मांत्रिकाची मदत घेण्यात आली.... विशेष म्हणजे हा मनिष ठाकूर आधी कॉन्स्टेबल होता, आता तो मांत्रिक झालाय.... आऊटलूकच्या या दाव्यानंतर या मांत्रिकाला झी २४ तासनं शोधून काढलं.... त्यानं मात्र असं काही घडलंच नसल्याचा दावा केलाय.
दाभोलकरांच्या तपासासाठी मांडलेल्या या जादूच्या खेळाची चौकशी व्हावी अशी मागणी हमीद दाभोलकरांनी केलीय.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला पुढच्या महिन्य़ात एक वर्ष पूर्ण होतंय... अजूनही या हत्येप्रकरणी एकालाही अटक झालेली नाही, ना पोलिसांना ठोस पुरावा सापडलाय... पोलिसांनी तपासात अशा प्रकारे जादूटोण्याची मदत घेतली असेल तर ते दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ते धक्कादायक आणि धोकादायक ठरेलच... पण एकंदरीतच पोलीस यंत्रणेवरचा विश्वासच उडून जाईल.
दरम्यान, गुलाबराव पोळ यांची बदनामी करण्याचं हे षडयंत्रण आहे, असा आरोप गुलाबराव पोळांच्या वकिलामार्फत करण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.