बुलडाणा :'आम्ही कधीच आत्महत्या करणार नाही... ना कुणाला करू देणार... आम्ही सारे मिळून आमचे गाव आत्महत्यामुक्त करू' अशी शपथच बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील परडा ग्रामस्थांनी घेतलीय.
कधी गारपीट... तर कधी दुष्काळ.... यामुळे होणारी सततची नापिकी आणि यामुळे डोक्यावर होणारा कर्जाचा डोंगर... अशा अनेक विवंचनेत सापडलेला शेतकरी यातून सुटका व्हावी म्हणून शेवटी मृत्यूला जवळ करतो. परंतु यामधून त्याची जरी सुटका होत असली तरी त्यांच्या कुटुंबासमोरच्या समस्यांनी मात्र अक्राळ-विक्राळ रुप धारण केलेलं असतं.
शेतकरी आत्महत्या थांबाव्या यासाठी शासनस्तरावरून अनेक प्रयत्न केले जात आहे. तरीदेखील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबातांना दिसून येत नाही. गावामध्ये शेतकरी आत्महत्या होणे म्हणजे गावासाठी शरमेची बाब असून तो एक प्रकारचा गावाला कलंक आहे, असं म्हणत बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील परडा ग्राम पंचायतच्या नवनिर्वाचित महिला सरपंच छायाताई पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामस्थांनी 'आत्महत्या होऊ न देण्याचा' एक ऐतिहासिक ठराव संमत केलाय.
'दुष्काळ, नापिकी किंवा आर्थिक संकटामुळे कधीच खचून जाणार नाही. आत्महत्या करणे हा कुटुंबाला व गावाला कलंक असून, तो आम्ही कधीही गावाला लागू देणार नाही याची ग्वाही देतो. आमच्या गावातील शेतकरी, शेतमजूर व इतर कोणीही आर्थिक संकटास सापडल्यास आम्ही सर्व मिळून त्यास मदतीचा हात देऊ आणि स्वाभिमानाने जीवन जगण्याचा प्रयत्न करू. आत्महत्या करणे हे स्मस्येचे उत्तर नसून, अनेक समस्यांची सुरुवात आहे. त्यामुळे आम्ही शपथ घेतो की, आम्ही कधीच आत्महत्या करणार नाही किंवा आमच्या गावातील कुणालाही आत्महत्या करू देणार नाही. सर्वमिळून आत्महत्यामुक्त गाव करण्याचा संकल्प करीत आहोत' अशी शपथ ग्रामस्थांनी ग्रामदेवतेसमोर घेतलीय.
या ठरावानुसार जर गावातील एखादा शेतकरी अशा विवंचनेत सापडला असेल तर त्याला संपूर्ण गावाने सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राम पंचायतीनं घेतलेल्या या निर्णयाचं समस्त ग्रामस्थांनी स्वागत केलंय. यापुढे कुठल्याही संकटाला घाबरून न जाता, आम्ही पूर्णपणे त्याला सामोरे जाऊन त्यावर मात करू असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केलाय.
परडा ग्रामस्थांनी घेतलेला हा निर्णय अतिशय महतत्वपूर्ण असून मोताळा तालुक्यातील सर्व म्हणजेच ६६ ग्रामपंचायतींमध्ये अशा प्रकारचा ठराव मांडण्याचा संकल्प मोताळा पंचायत समितीने घेतलाय. यामुळे, शेतकऱ्यांना नक्कीच एक खंबीर आधार मिळेल आणि आत्मविश्वास पुन्हा मिळवायला नक्कीच मदत होईल, असा विश्वास पंचायत समितीला वाटतोय.