एका दिवसात शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी नाराजीची लाट

अमळनेर तालुक्यात सध्या चर्चेचा एकच विषय आहे, पाडळसरे धरणाला फक्त सहाच कोटी का?, या धरणाचं काम २० वर्षात फक्त ३५ टक्के झाले आहे. नवीन सरकार आल्याने धरणाचं काम नक्की पूर्ण होईल, अशी भाबळी आशा शेतकऱ्यांना होती. सोशल मीडियावरही याविषयीच्या स्थानिक वृत्तपत्रातील बातम्या देखील व्हायरल होत आहेत.

Updated: Mar 20, 2016, 06:30 PM IST
एका दिवसात शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी नाराजीची लाट title=

जळगाव : अमळनेर तालुक्यात सध्या चर्चेचा एकच विषय आहे, पाडळसरे धरणाला फक्त सहाच कोटी का?, या धरणाचं काम २० वर्षात फक्त ३५ टक्के झाले आहे. नवीन सरकार आल्याने धरणाचं काम नक्की पूर्ण होईल, अशी भाबळी आशा शेतकऱ्यांना होती. सोशल मीडियावरही याविषयीच्या स्थानिक वृत्तपत्रातील बातम्या देखील व्हायरल होत आहेत.

शेतकऱ्य़ाचं मन जिंकण्याची संधी दवडली

नव्याचे नऊ दिवस गेले, आणि मात्र शेतकऱ्यांच्या भाबळ्या मनाला राजकारण्यांनी सुरंग लावले. जिल्ह्याचेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सर्वांना समान न्याय या तत्वाने शेतकऱ्यांचं मन जिंकण्याची संधी होती, मात्र ही संधी त्यांनी दवडली आणि दुष्काळाचे चटके घेत जगणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी नाराजीची भावना पसरली आहे.

तालुक्याला आमदार २ आणि धरणाला फक्त ६ कोटी

अमळनेरचे अपक्ष आमदार चौधरी यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे, विधान परिषदेतून स्मिता वाघ या भाजपच्या आमदार आहेत. तरीही या धरणाला ६ कोटीच निधी आल्याने, शेतकऱ्यांमध्ये गावोगावी हा चर्चेचा विषय ठरला आहे. या सरकारला शेतीविषयी जिव्हाळा नाही की, जिल्ह्यातील मोठ्यांचं राजकारण शेतकऱ्यांना भोगावं लागतंय, असे सवाल उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्री नक्की काही तरी करतील

दुसरीकडे जिल्ह्यातील वाघूर धरणाला ३०० कोटी रूपये मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, कारण पाडळसरे धरणाला ५० ते ६० कोटी रूपये जरी मिळाले असते, तरी धरणाच्या कामाला चालना मिळाली असती. महाराष्ट्रात कुणाचं सरकार आहे, आणि मंत्री कसे वागतात, कोणती गणितं लावतात, यापेक्षा पृथ्वीराज चव्हाणांनंतर, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे महाराष्ट्राला आणखी एक, चांगले मुख्यमंत्री लाभल्याने, ते नक्कीच पाडळसरेसाठी काही तरी चांगला निर्णय घेतील, अशी भाबळी आशा शेतकऱ्यांना आहे.