नाशिक : येथील जिल्हा रुग्णालय भ्रुण हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेत, आरोग्य सहसंचालक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी रुग्णालयातले अधिकारी आणि कर्मचा-यांची चौकशी सुरु केली आहे. प्रथमदर्शनी डॉ. वर्षा लहाडे या दोषी आढळल्या आहेत.
झी २४ तासनं जिल्हा रुग्णालयात भ्रुण हत्येची बातमी सर्वप्रथम दाखवली होती. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती. बेकायदेशीररित्या गर्भपात करणाऱ्या डॉ. वर्षा लहाडेसह कोण कोण अशा बेकायदेशीर उद्योगात गुंतले आहेत त्याची तपासणी सुरू आहे. आरोग्य विभागाच्या सहसंचालिका अर्चना पाटील या नाशिक रूग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. काही तासांतच निलंबनाच्या कारवाईची शक्यता आहे.
स्त्री रोग तज्ज्ञ वर्षा लहाडे यांच्या रुग्णालयावर उच्चपदस्थ समितीनं धाड घातली होती. शासकीय रूग्णालयातच 200 हून अधिक भ्रुण हत्या झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात वर्षा लहाडेंसह अनेक डॉक्टरांचा सहभाग असल्यानं ही कारवाई झाली.
गेल्या दोन वर्षांपासून कुठलीही परवानगी न घेता खासगी दवाखाना थाटून सोनोग्राफी करण्यात येत होती. या प्रकरणाचा अहवाल आरोग्यमंत्र्याकडे देण्यात येणार आहे.
या धाडसत्रामुळं भ्रुण हत्या प्रकरणातील अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. सरकारी रुग्णालायत स्त्री भ्रुण हत्या होत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.