www.24taas.com, झी मीडिया, उस्मानाबाद
नवीन वर्षात एसटी महामंडळानं एक खुशखबर दिलीय. आत्तापर्यंत एकदा नोकरभरती झाली की पुढचे चार-पाच वर्ष स्थगित राहणारी नोकरभरती यंदाच्या वर्षापासून दरवर्षी आणि तेही नियमितपणे होणार असल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलंय.
नुकतीच, एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलीय. मुबलक मनुष्यबळ असेल तर एसटीचा तोटा कमी होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केलीय. लोकसभा निवडणूक २०१४ ची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच यंदाची नोकरभरती सुरु होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
वर्ष २०१४ च्या मार्च अखेरपर्यंत काम सुरू होईल. मेकॅनिक, चालक, वाहक यांच्यासह अधिकाऱ्यांच्याही रिक्तण जागा भरल्या जाणार आहेत. गोरे यांच्या म्हणण्यानुसार, प्रासंगिक कराराचे दरही घटविण्यात आले आहेत. गाडी १२ तासांत जाऊन येणार असेल, तर आता केवळ २०० किलोमीटरचं भाडं आकारलं जाईल. याच तिकीटासाठी पूर्वी ३०० किलोमीटर अंतराचे दर आकारले जायचे. शालेय सहलीसाठी ५० टक्के सवलत असल्याचेही त्यांनी सांगितले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.