प्रशांत परदेशी, नंदूरबार : नंदुरबारमधील अदिवासी शेतक-यांनी स्वप्रयत्नानं आपल्या शेतीतच गुळ निर्मितीचा कारखाना उभारलाय. यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा होतोय.
काबाड-कष्ट करून उसाला भाव मिळत नसल्यामुळे नवापूर तालुक्यातल्या भोवरमधल्या आदिवासी शेतकऱ्यांनी गूळ निर्मितीचा कारखाना उभारलाय. भरत आणि विश्वास गावित या आदिवासी शेतक-यांनी शेतातच ऊसावर प्रक्रिया करून गूळ निर्मिती सुरु केलीय. यात शेतक-यांना एका टनापासून १२५ किलो गुळाचं उत्पन्न मिळतंय. त्यातून त्यांना प्रतिटन १५०० रुपये निव्वळ नफा मिळतोय.
आदिवासी शेतकऱ्यांनी स्वप्रयत्नानं हा गुळाचा कारखाना उभारलाय. तयार होणाऱ्या गुळात कुठल्याही प्रकारची रसायनं मिसळली जात नसल्यामुळे गुळाचा दर्जा उत्तम असून त्याला चांगली मागणीही आहे. मात्र कारखाना उभारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचं गावित कुटुंब सांगतं.
गूळ निर्मितीचा कारखाना उभारण्यामध्ये शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि 'आत्मा' योजनाचाही मोठा फायदा झाल्याचं या योजनेचे प्रकल्प संचालक सचिन पोटे यांनी म्हटलंय.
बँकांनी कारखाना सुरु करण्यास भांडवल देण्यास नकार दिला होता. तरी सुद्धा स्वत:च्या हिंमतीवर या आदिवासी शेतक-यांनी कारखाना उभारलाय. या शेतक-यांचा आदर्श इतर शेतक-यांसाठीही अनुकरणीय आहे.