प्रताप नाईक, कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झालीय. २१ एप्रिलला यात्रेचा मुख्य दिवस आहे. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोव्यातून दीड लाख भाविक जोतिबाच्या डोंगरावर दाखल होण्याचा अंदाज प्रशासनानं व्यक्त केलाय.
जोतिबाच्या नावानं चांगभलं... केदार नाथांच्या नावानं चांगभलं... यांसारख्या गजरात कामदा एकादशीपासून जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरवात झालीय. मानाच्या सासनकाठ्या, गुलाल आणि खोबऱ्याच्या उधळणीमुळं संपूर्ण मंदिर परिसर न्हाऊन निघालाय. अनेक भक्तांचं जोतिबा कुलदैवत असल्यानं न चुकता भाविक इथं दर्शनाला येतात.
राज्यात भीषण दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे यंदा तरी राज्यातला दुष्काळ सरू दे, बक्कळ पाऊस पडू दे असं साकडं जोतिबाला भाविक घालतायत.
जोतिबाच्या डोंगरावर भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवलाय. डोंगरावर ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत तर भक्तांसाठी ४० हजार लिटर पाण्याची सोय केलीय. जोतिबाच्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोव्यातून जवळपास दीड लाखांहून अधिक भाविक डोंगरावर येण्याचा अंदाज व्यक्त होतोय. यात्रेला कुठलंही गालबोट लागू नये यासाठी प्रशासनानंही जय्यत तयारी केलीय.