पुणे : (अरूण मेहेत्रे, झी मीडिया) सर्वसामान्यांच्या ताटातली डाळ पुन्हा एकदा गायब होण्याची शक्यता निर्माण झालीय. गेल्या 2 दिवसांत डाळींचे भाव झपाट्याने वधारले आहेत. तूर डाळ 160 रूपये किलोवर गेली आहे.
ऐन दिवाळीत डाळीने सर्वांचीच परीक्षा पाहिली होती. तूरडाळीचे दर गगनाला भिडले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारला मोठी कसरत करावी लागली होती. महत्प्रयासाने डाळींचे दर आवाक्यात आणले होते. मात्र आता 5 महिन्यांनंतर डाळ पुन्हा भडकण्याची चिन्हं आहेत. किरकोळ बाजारात डाळींचे भाव झपाट्याने वाढत आहेत.
आजच्या तारखेला
तूरडाळ 145 ते 160 रूपये किलो
हरभरा डाळ 75 ते 80 रूपये किलो
मूगडाळ 95 ते 100 रूपये किलो
मसूरडाळ 75 ते 80 रूपये किलो
उडीदडाळ 170 ते 200 रूपये किलो दराने विकली जातेय.
यावर्षी देशात 17 लाख टन डाळीचं उत्पादन अपेक्षित होतं. मात्र दुष्काळ तसंच इतर कारणांमुळे 15 लाख टनांच उत्पादन झालंय. देशाची डाळीची गरज 22 लाख टनांची आहे. या पार्श्वभूमीवर डाळीची बाजारातली आवक मंदावली आहे. त्याचा परिणाम म्हणून डाळींचे भाव वाढलेत.
डाळींचे भाव वाढण्यास काही कृत्रिम घटकही कारणीभूत असू शकतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर डाळींचे भाव नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. नाहीतर पुन्हा डाळ 200 रूपये किलोवर गेल्यास आश्चर्य वाटायला नको.