नाशिक : कुंभमेळ्यातलं पहिलं शाही स्नान शनिवारी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय. रामकुंडाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरीकेड्स लावून बंद करण्यात आलेत. तर साधू महंतांसाठी शाही मार्ग प्रशस्त केलाय.
उदया शनिवारी कुंभमेळ्यातलं पहिलं शाहीस्नान पार पडतंय. त्यासाठी प्रशासन झोकून कामाला लागलंय. गर्दीचं योग्य नियोजन हा महत्त्वाचा भाग आहे. शहरातले सर्वच अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले आहेत. भाविक, प्रशासकीय आणि आपत्कालीन मार्ग अशा तीन टप्प्यात रस्त्यांचं वर्गीकरण करण्यात आलंय. प्रशासकीय मार्गावरून सरकारी अधिकारी, पोलीस प्रशासन, गरज पडल्यास रूग्णवाहिकांसाठी धावणार आहेत.
दुर्घटना घडल्यास भाविकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी आपत्कालीन मार्गाची व्यवस्था करण्यात आलीय. 28 तारखेला सकाळपासूनच शहरातले एकापाठोपाठ एक रस्ते बंद करण्यात येणार आहेत. घाटांपासून 2 किलोमीटर अंतर नो व्हेईकल झोन घोषित करण्यात आलंय. शाही मिरवणुकीच्या मार्गावर साधूग्राम ते रामकुंडपर्यंत मार्गावर चोख बंदोबस्त आहे. आखाड्यांच्या स्नानानंतर भाविकांसाठी रामकुंड खुलं करण्यात येईल.
बाह्य पार्कींगपासून अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळवलं जाईल. ज्या एसटी बस नाशिकमार्गे प्रवास करतात त्यांना बाह्य पार्कींगपासून बाह्य रस्त्याने वळवलं जाईल. नाशिकमध्ये येणा-या भाविकांसाठी जागोजागी मार्गदर्शक फलक लावले आहेत ते पाहण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. नाशिक शहर परिसरात 15 ते 17 हजार पोलीस, गृहरक्षक दल, स्ट्रायकींग फोर्स, बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आलंय. या पथकांची रंगीत तालीमही झालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.