रत्नागिरी : देशात धुमधडाक्यात दिवाळी साजरी होतेय. रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी सुरु असताना समाजातील उपेक्षित घटक आजही नजरेआड आहे. अशाच उपेक्षित मुलांचं जीवन दिव्यांच्या लख्ख प्रकाशाप्रमाणे उजळवण्याचं काम केलंय रत्नागिरीतल्या आशादीप या संस्थेनं केलंय.
चेहऱ्यावर निरागस भाव. प्रचंड आत्मविश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असलेली ही मुलं आहेत थोडी खास. गतिमंद असल्यानं आपल्या माणसांनी दुर्लक्षित केलं असलं तरी ही मुलं आहेत स्पेशल. या स्पेशल मुलांचं स्पेशल सेलिब्रेशन सुरु आहे. चोहीकडे दिवाळीचा जल्लोष सुरु झाला असताना रत्नागिरीच्या आशादीप या संस्थेतली ही मुलं तरी मागं कशी राहतील. सारं दुःख विसरुन या मुलांनी दिवाळीचा मनमुराद आनंद लुटला. नवीन कपडे, फटाके, पणत्या, रांगोळी या सा-या गोष्टींमुळं या मुलांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी काहींच्या पालकांनीही मुलांसोबत दिवाळी साजरी केली.. तर अशा उपेक्षित मुलांच्या जीवनात आनंदाचे चार क्षण आणण्याचं काम आशादीपच्या पदाधिका-यांनी केलं.
आपल्या माणसांनी आणि समाजानं झिडकारलं असलं तरी ही मुलं जराही डगमगलेली नाहीत. सामान्यांप्रमाणे उत्साहात दिवाळी साजरी करुन अनंत आमुची ध्येयासक्ती ही उक्ती सार्थ ठरवतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.