अहमदनगर : नवरा आणि सासरच्या मंडळींकडून दिला जाणारा त्रास आणि मनाचा कोंडमारा सहन न झाल्यानं एका डॉक्टर महिलेनं आपल्याच नर्सिंग होमच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केलीय.
रविवारी रात्री साडे आठ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडलीय. एमबीबीएस सुजाता आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. नीलेश शेळके यांचा 14 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दाम्पत्याला रिया (13 वर्ष) आणि रिचा (7 वर्ष) या दोन मुलीही आहेत.
डॉक्टर निलेश शेळके यांनी डॉ. सुजाता यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांचा छळ सुरु केला होता. तसंच हॉस्पिटलसाठी माहेरातून 15 लाख रुपये आणण्याची मागणीही केली होती... सुजाता यांना उपाशीही ठेवलं जातं होतं... नुकतीच, निलेश यांनी सुजाताला घटस्फोटाची नोटीसही दिली होती. तेव्हापासून डॉ. सुजाता आपल्या दोन मुलींसह नर्सिंग होमच्या इमारतीत राहायला गेल्या होत्या. डॉ. निलेश आणि त्यांचे कुटुंबीय माणिकनगरमध्ये राहतात. आत्महत्या करण्यापूर्वी सुजाता आणि निलेश यांच्यात वाद झाला होता, असे गंभीर आरोप सुजाता यांचे वडील प्रा. अरुण भिला पाटील यांनी केलेत.
छळ वाढू लागल्याने दोन दिवसांपूर्वी डॉ. सुजाता यांनी धुळय़ाला आई-वडिलांना दूरध्वनी करून बोलावून घेतलं होतं. रविवारी दुपारी इथं आल्यानंतर त्यांनी शेळके कुटुंबीयांना समजावण्याचा प्रयत्न केला. रात्री साडेआठच्या सुमारास देवदर्शन करून येते, असं सांगून सुजाता तिसऱ्या मजल्यावर गेली.... आणि तिथूनच तिनं खाली उडी मारली. यानंतर, सुजाता यांना त्यांच्या वडिलांनीच हॉस्पीटलमध्ये हलवलं... पण, उपचारापूर्वीच सुजात यांचा मृत्यू झाला होता. ही घटना नीलेशला समजल्यानंतर तो लागलीच आपल्या दोन मुलींसह फरार झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथकं रवान केली आहेत.
या प्रकरणात डॉ. नीलेश शेळके, त्याचे वडील विश्वास शेळके, आई सुनीता शेळके, शेळके यांचा मित्र अतुल औताडे आणि वाहनचालक अब्दुल अजीज अशा पाच जणांविरोधात सुजाताला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.