बीड : महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर जोरदार शक्तीप्रदर्शऩ केलं. सुमारे पाऊण तास केलेल्या भाषणात आपले चुलतबंधू आणि कट्टर विरोधक धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दांत त्यांनी तोफ डागली.
महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत या आपल्या भावांना आपल्यामुळेच मंत्रीपदं मिळाली, असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला असला तरी थेट नेतृत्वाला आव्हान देण्याचं पंकजांनी टाळलं. भगवानगडाच्या गादीबाबत आपल्याला आदर आहे आणि आता आपल्याला भाषण नाकारणारे महंतच पुढल्या वर्षी त्या गादीवरून आपल्याला आमंत्रण देतील असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.