अकोला : 'कानून के हाथ लंबे होते है', हा प्रसिद्ध संवाद आपण सर्वांनीच, अनेक चित्रपटांतून असंख्य वेळा ऐकला आहे. मात्र अकोला जिल्ह्यातल्या एका आरोपीला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आलाय.
15 नोव्हेंबर 1981 रोजी राजस्थानमधल्या चिडावा इथून तामिळनाडूतल्या मदुराईला जाणारी एक मालगाडी अकोला रेल्वे स्थानकावर उभी होती. त्यावेळी 22 वर्षांचा असलेल्या माणिक नृपनारायण यानं, नऊशे रुपयांच्या 15 किलो चणाडाळीची चोरी केली होती. तेव्हापासून गेली 35 वर्षं तो फरार होता.
मात्र आरपीएफ पोलीस माणिकचा कसून शोध घेत होते. मंगळवारी 4 सप्टेंबरला माणिक अकोल्यात आपल्या घरी आल्याची माहीती रेल्वे पोलिसांना मिळाली. आणि अखेर तब्बल 35 वर्षांनी रेल्वे पोलिसांनी माणिकला जेरबंद केलं.
भुसावळमधल्या विशेष रेल्वे न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं. एका अपंग मुलासह पत्नीची जबाबदारी असलेल्या माणिकला विशेष न्यायालयानं हजार रूपयांचा दंड किंवा एक दिवसाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
हा दंड भरल्यानंतर न्यायालयानं त्याची सुटका केली. पाहिलंत ना कायद्याचे हात खरोखरच लांब असतात. त्यामुळे गुन्हा केलेला, कायद्याच्या कचाट्यातून कधीच सुटू शकत नाही.