कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : निवडणुकींना सामोरं जाताना पक्षांची एक ठराविक स्थिती असते... पिंपरी चिंचवडमध्येही सध्या विविध राजकीय पक्षांची वेगवेगळी स्थिती आहे...!
आयात नेत्यांच्या जीवावर भाजपचा फाजील आत्मविश्वास दिसतोय, तर पक्षातल्या गळती मूळ राष्ट्रवादी गोंधळलेली दिसत असताना अजित पवार यांच नेतृत्व पक्षाला अजून ही आत्मविश्वास देतय..शिवसेनेची शांतीत क्रांती सुरू आहे आणि काँग्रेस, मनसे आपले होणार काय या विचारात गढुन गेलीय...! मतदारांना मात्र सर्वच गृहीत धरतायेत...!
निवडणूक आयोगान महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आणि अखेर महापालिकेच्या रणसंग्रामाला समोर जाण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या... पिंपरी चिंचवड मध्ये ही सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकांना समोर जाण्यासाठी कंबर कसलीय....
शहरात भाजप तर निवडणुकापूर्वीच जिंकल्याच्या आविर्भावात वावरतेय... राष्ट्रवादीच्या नेत्यांना आयात केल्यामुळं विजय निश्चित असल्याची धारणा भाजपच्या अनेकांची झालीय... अनेक उमेदवारानां महापौर, स्थायी समिती अध्यक्षपदाची स्वप्नं पडू लागलीयेत... एकूणच काय तर पक्षातल्या अनेकांना फाजील आत्मविश्वासाने ग्रासलंय...! एकीकडं हा फाजील आत्मविश्वास असताना अनेक नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खालच्या पातळीवर प्रचार सुरु केलाय तो कश्यासाठी हा प्रश्न आहेच...!
राष्ट्रवादी काँग्रेस ची अवस्था मात्र गोंधळलेली आहे...! अनेक नेते पक्ष सोडून जात असताना, शक्य असून ही अजित पवार यांनी त्यांना का जाऊ दिले असा विचार दुसऱ्या फळीतले नेते करतायेत..पण अजून ही अजित पवार यांचा तोल ढळलेला नाही आणि सत्ता राहणार हा त्यांचा आत्मविश्वास राष्ट्रवादीला आश्वासक वाटतोय आणि अनेकांना आत्मविश्वास देतोय...! अजित पवार अजून ही पत्ते उघडत नसल्यामुळं अनेकांना पवारांच्या डोक्यात चाललंय काय हा प्रश्न सतावतोय...!
शिव सेना मात्र शांतीत क्रांती करतेय...भाजप राष्ट्रवादी मध्ये टोकाचा संघर्ष असताना शिवसेना केवळ प्रभागात काम करत असून भाजप राष्ट्रवादी मध्ये काय होतेय या वर शिव सेनेची रणनिती आहे.. काँग्रेस आणि मनसे ची अवस्था राम भरोसे आहे...! राष्ट्रवादीने आधीच तगड्या नेत्यांना फोडल्यामुळं आपलं काय होणार या विचारात काँग्रेस आहे...!
इतर पक्षातल्या इच्छूकांना तिकीट मिळाली नाही तर ते आपल्याकडे येतील आणि चांगले उमेदवार मिळतील अशी आशा काँग्रेसला आहे... मनसे ही अस्तित्वाची लढाई लढतेय आणि मनसेला आपण एक आकडा तरी गाठतोय का हा प्रश्न पडलाय...
एकूणच काय तर सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ्या परिस्थितीत निवडणुकींना सामोरं जात असताना मतदारांना मात्र गृहीत धरतायेत...! आता मतदार काय करतायेत हे पाहणं महत्वाचं आहे...!