पुणे : राज्याची सांस्कृतीक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्याला आता आणखी एक ओळख मिळाली आहे. नोकरीच्या संधी निर्माण करण्यात पुणे देशात सहाव्या स्थानावर आहे. ३ महिन्यात पुण्यात ४९ हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या. नोकरीच्या एकूण संधींमध्ये सहा टक्के वाटा हा पुण्याचा असल्याचा द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इन्डस्ट्रीज ऑफ इंडिया संघटनेने सांगितले आहे. तीन महिन्यात देशात साडे आठ लाख संधी निर्माण झाल्या होत्या. देशातील नोकरीच्या संधी निर्माण करणाऱ्या शहरांमध्ये पुणे सहाव्या स्थानावर आहे.
पुण्यासह दिल्ली, बंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकता या शहरांमध्ये सर्वे करण्यात आला आहे. देशात सर्वाधिक अडीच लाख नोकरीच्या संधी दिल्लीमध्ये होत्या तर अहमदाबादमध्ये सर्वात कमी म्हणजे २० हजार ५०० संधी होत्या. मुंबई या यादीत तिसऱ्या स्थानावर असून साधारण दीड लाख संधी मुंबईत निर्माण झाल्या होत्या. बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद ही शहरे पुण्यापेक्षा आघाडीवर आहेत.
कोणत्या क्षेत्रात किती संधी निर्माण झाल्या याचाही अभ्यास करण्यात आला. एकूण नोकऱ्यांपेकी ६० टक्के संधी या माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाला पूरक असणाऱ्या क्षेत्रात होत्या. त्या खालोखाल सेवाक्षेत्रात संधी असल्याचे दिसून आले. पुण्यातही सर्वाधिक ३२ हजार १७४ संधी या आयटी क्षेत्रात होत्या. देशातील एकूण संधीच्या तुलनेत हे प्रमाण ६.२ टक्के आहे.
दिल्ली - २ लाख ५६ हजार ९२६, बंगळुरू - १ लाख ९९ हजार १४५, मुंबई - १ लाख ५८ हजार ५५४, चेन्नई - ८२ हजार २५७, हैदराबाद - ६० हजार ४५५, पुणे - ४९ हजार २०७, कोलकाता - २५ हजार २५१, अहमदाबाद - २० हजार ५४१