रत्नागिरी : येथील नगरपरिषदेची मासिक सभा दोन वेळा तहकूब करण्यात आली. त्यामुळे अनेक विकास कामे मंजूर झालेली नाहीत. मात्र राजकीय पक्ष या मुद्यावरुन एकमेकांवर चिखलफेक करण्यातच धन्यता मानत आहेत.
रत्नागिरी नगरपरिषदेत सध्या येवू घातलेल्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. रत्नागिरीच्या नगराध्यक्षांसह सगळेच नगरसेवक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यातच धन्यता मानताना दिसताहेत. शहराचा विकास हा फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे खुंटल्याचा आरोप रत्नागिरीचे भाजप नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी केला आहे.
नगराध्यक्षांचे आरोप खोडून काढताना, शिवसेना, राष्ट्रवादीनं उलट भाजप नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले आहे. रत्नागिरी शहरातली अनेक विकासकामे आजही खोळंबलेली आहेत. त्यामुळे नगारिकही नगरपरिषदेच्या कारभारावर चांगलेच नाराज आहेत.
रत्नागिरी नगरपरिषदेत गेल्या विधानसभा निवडणुकीपासूनच शिवसेना भाजपचे पटत नाही. आता तर सर्वच राजकीय पक्ष एकमेकांची उणीधुणी काढण्यातच धन्यता मानत आहेत. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.