पिंपरी-चिंचवड: मुलगा शिकून मोठा होईल या आशेनं मोठ्या कॉलेजमध्ये मुलाला शिकायला पाठवलं जातं. पण अचानक तोच मुलगा आपण आत्महत्या करणार असं सांगतो आणि गायब होतो. त्यानंतर सुरु होते त्यांच्या वडिलांची परवड. तो येईल या आशेनं त्याची शोधाशोध. सध्या ही घालमेल अनुभवत आहेत, अहमदनगरचे भगवान व्यवहारे...
पिंपरी चिंचवडच्या डी. वाय. पाटील कॉलेजच्या गेटकडे नजर लाऊन बसलेले हे अभागी वडील… मूळचे नगरचे असलेले भगवान व्यवहारे यांनी त्यांच्या अभिजीत या मुलाला याच कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगसाठी प्रवेश दिला होता. पण त्यांच्या मुलानं दोन दिवसांपूर्वी फेसबूकवर सुसाईड नोट टाकली आणि तो गायब झाला. शनिवारी त्याची परीक्षा होती. गायब होण्यापूर्वी त्यानं हॉल तिकीटही घेतलं होतं. त्यामुळे तो येईल या आशेनं त्याच्या वडिलांनी, मुलाच्या मित्रांसह कॉलेजच्या गेटवर ठाण मांडलं होतं. मात्र बेपत्ता झालेला अभिजीत काही आला नाही.
अभिजीतच्या या अशा अचानक बेपत्ता होण्यानं त्याचे बालपणीचे मित्रही हवालदील झालेत. अभिजीतचा शोध लागावा यासाठी त्यांचाही आटापिटा सुरु आहे.
अभिजीत सुसाईड नोट लिहून गायब झालाय. पण त्याच्यामागे त्याच्या वडिलांची अक्षरशः ससेहोलपट सुरु झालीय. हातातोंडाशी आलेल्या तरुण मुलाच्या अशा अचानक गायब होण्यानं, त्याच्या वडिलांच्या मनावर झालेला आघात पाहावत नाही. अभिजितला त्याच्या वडिलांच्या मनाची वेदना कळावी आणि तो परत यावा हीच अपेक्षा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.