ठाणे : येथील कृष्ण निवास इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सावंत कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. त्यात दोन दिवसांपूर्वीच आपला सातवा बर्थ डे साजरा करणाऱ्या एका गोंडस चिमुकलीचाही समावेश आहे. काळीज पिळवटून टाकणारी अमित खोत यांची ही करूण कहाणी.
अमित खोत यांच्यावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय. दोन दिवसांपूर्वी आपल्या सासऱ्यांकडे राहायला गेलेले अमित खोत आता एकटेच या जगात उरलेत. सासरे अरूण सावंत, मेहुणा अमित सावंत यांच्यासह पत्नी भक्ती आणि सात वर्षांची चिमुकली बाहुली अनिया त्यांची साथ सोडून देवाघरी निघून गेलेत.
गेल्या रविवारीच अनिया नावाच्या या चिमुकल्या परीचा सातवा वाढदिवस सावंत आणि खोत कुटुंबानं साजरा केला. बर्थ डे सेलिब्रेशननंतर अमित आपली बायको आणि मुलीसह सासुरवाडीला कृष्ण निवासमध्येच राहिले. मंगळवारी ते आपल्या घरी परतणार होते. मात्र सोमवारी रात्रीच ही इमारत कोसळली आणि घरातले सगळेच ढिगाऱ्याखाली गाडले गेले. एकटे अमित खोत तेवढे बचावले. सर्वस्व गमावलेल्या अमित खोत यांचं हे दुःख चटका लावणारं आणि काळजाला घर पाडणारं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.