ठाणे : विरार येथील वागड गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल, या शाळेतील तीन विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.
दीपू सुदनशिवकुमार गर्ग आणि संदीप पालव अशी अटक करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत. मुलांना शिक्षा केल्याने तसेच आपल्याला पुन्हा शिक्षा होईल या भितीने मीत सुरेश छाडवा (१४,मालाड), प्राहूल नारायण पटेल (१४, गोराई बोरीवली), कुशल निलेश दाघा (१४, डोंबिवली) या विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपविले होते.
शिक्षेनंतर बेपत्ता झालेल्या तीन मुलांचे मृतदेह दोन दिवसांनी नदीच्या पात्रात आढळल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. विरार पोलिसांना वागड गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल शाळेतील तीन विद्यार्थ्यांचे मृतदेह सकाळी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या नदीत आढळले. या घटनेनंतर शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांचे जबाब घेण्यात आले.
हे तिनही विद्यार्थी नववी इयत्तेत शिकत होते. तिघे २५ ऑगस्टला रात्री ८.३० ते ९च्या सुमारास शाळेतून निघून गेले होते. इतर चार विद्यार्थ्यांनी या तिघांना जाताना पाहिले होते. मुले बेपत्ता झाल्याची तक्रार शाळेकडून मंगळवारी विरार पोलिसांत देण्यात आल्यानंतर या तिघांचा शोध घेण्यात येत होता. बुधवारी सकाळी या तिघांचे मृतदेह शाळेजवळ असलेल्या सुक नदीच्या पात्रात तरंगताना आढळले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.