औरंगाबाद : पोलीस भल्याभल्यांच्या अंगातलं भूत काढतात, असं म्हणतात. पण एका पोलीस स्टेशनमध्येच चक्क भूत अवतरलं. नुसतं भूत आलंच नाही, तर त्यानं पोलिसांनाच धमक्या दिल्या.
दौलताबादजवळ भांगसीमाता गडाजवळच्या कोरडी गावात राहणारी सुनिता जाधव ही अशीतशी साधी महिला नाही. म्हणे मांत्रिक आहे. भूत-करणी काढण्यासाठी लोक तिच्याकडे येतात. काही दिवसांपूर्वी एका 16 वर्षाच्या मुलीच्या अंगात भूत संचारल्याचं तिच्या पालकांना वाटलं आणि त्यांनी उपचारासाठी या मुलीला सुनिताकडे आणलं. उपचाराच्या नावाखाली तिनं मुलीला चटके दिले आणि तिचा छळ केला. ही बाब काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर पोलिसांच्या मदतीनं मुलीची सुटका झाली आणि सुनिताला अटक झाली. मात्र सोमवारी पोलीस स्टेशनमध्येच सुनिताच्या अंगात अचानक भूत संचारलं आणि पोलिसांनाच धमक्या देऊ लागलं.
सुनिताच्या या नौटंकीमुळे पोलीस स्टेशनात काही काळ गोंधळ उडाला आणि उपस्थितांचं मनोरंजनही झालं. मात्र पोलिसांनी या भुताला काही भिक घातली नाही. सुनिताला कोर्टात हजर करण्यात आलं आणि न्यायालयीन कोठडी देण्यात आली. कोर्टात या भुतानं न्यायमूर्तींना धमक्या दिल्या की नाही, ते कळायला मार्ग नाही.
पाहा व्हिडिओ