जालना : जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली आहे. त्यामुळे पुन्हा निवडणुकीआधी पैशाचे वाटप होत असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांच्या जालना जिल्ह्यातही अशीच घटना घडलीय. स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर निवडणूक लढवत असलेल्या परतूरमध्ये मतदारांना पैशाचं आमिष दाखवल जात असल्याचं समोर आलंय. पैशाचं वाटप केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
जुन्या हजार आणि पाचशे रुपयांची 10 लाखांची रोकड कोपरगावकडून पुणतांबा चौफुलीवर आलेली कारमधून जप्त करण्यात आली. पोलिसांनी कारमधील मुरलीधर धात्रक आणि भोलेनाथ मानेला याप्रकरणी ताब्यात घेतलंय. पकडलेल्या कारच्या मागील बाजूस भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि कमळ चिन्हाची प्रतिमा आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलंय.
तर यवतमाळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैश्यांचे वाटप होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून ग्रामस्थांनी याबाबत आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे केली आहे.