झी २४ तास वेब टीम, मुंबई
लोकपालच्या तिसऱ्या लढ्याला आज मुंबईच्या एमएमआरडीए मैदानावर सुरुवात झाली. आजचा संपूर्ण दिवस मुंबईकरांसाठी मोठ्या घडामोडींचा ठरला.. सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले ते लोकपालसाठी लढा उभारणारे अण्णा हजारे.. काय घडलं आज दिवसभरात याचा हा खास वृत्तांत.
वेळ : सकाळी ९ वाजता
स्थळ : वांद्रे, शासकीय गेस्टहाऊस
मंगळवारची सुरुवातच झाली तीच मुळी अण्णा आणि लोकपालच्या लढ्याच्या बातम्यांनी.. मुंबईत झालेल्या जोरदार स्वागतानंतर अण्णा वांद्र्याच्या शासकीय गेस्टहाऊसमध्ये रात्री मुक्कामाला होते.. सकाळी ९ च्या सुमारास पांढऱ्या शुभ्र कपड्यांत अण्णा लोकपालच्या दीर्घ लढ्यासाठी बाहेर पडले. झेड दर्जाची सुरक्षाव्यवस्था असलेले अण्णा आणि त्यांच्या गाड्यांच्या ताफा तिथून जूहूच्या दिशेनं रवाना झाला.
स्थळ : कलानगर, वांद्रे
अण्णांच्या गाड्यांचा ताफा वांद्र्याचा कलानगर भागात आल्यानंतर, रॅलीला थोडा विरोध झाला. संविधान बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी अण्णांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. गेस्टहाऊसमधून निघालेल्या अण्णांना जुहूच्या दिशेनं जात असताना वांद्र्याजवळ कार्यकर्त्यांनी काळे झेंडें दाखवत आंदोलनाचा निषेध केला. पण पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखलं.
वेळ : सकाळी १० वाजता
स्थळ : जूहू चौपाटी
त्यानंतर अण्णा पोहोचले जुहू चौपाटीवर.. या ठिकाणी असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासोबत टीम अण्णाचे सदस्य संतोष हेगडेही उपस्थित होते. अण्णांच्या समर्थकांनीही या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. तर प्रसारमाध्यमांच्या टीमही ही दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी सज्ज होत्या. महात्माजींच्या पुतळ्यासमोर अण्णांनी काही काळ ध्यानही केलं. लोकपालला लढ्यासाठी सरसावलेल्या अण्णांची प्रकृती तीन दिवसांपासून काहीशी खराब आहे. मात्र तरीही अण्णांनी उपोषणाच्या कार्यक्रमात कोणताही बदल केला नाही. गांधींजींच्या पुतळ्यासमोर ध्यानस्थ बसलेल्या अण्णांनी या लढ्यासाठी आत्मिक बळ मिळवलं.
वेळ :१०.४० वाजता.
स्थळ : जुहू चौपाटी
यानंतर अण्णा एका सजवलेल्या ट्रकवर आरुढ झाले. आणि इथून एमएमआरडीकडे येण्यासाठी अण्णांच्या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीच्या अग्रस्थानी इनफिल्ड बुलेटवर अण्णांचे समर्थक होते. तर अण्णांसोबत मोठा जनसमुदाय होता. प्रत्यक्ष ट्रकवर अण्णा, त्यांचे सहकारी अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी होते. यावेळी तिरंगा हातात घेतलेले अण्णा समर्थक जोरदार घोषणाबाजी करत होते.