www.24taas.com, मुंबई
कृपाशंकर सिंह यांची वांद्र्यातील साईप्रसाद बिल्डिंग वादाच्या भोव-यात सापडली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी आरक्षित भूखंडावर ही इमारत बांधण्यात आली आहे. एवढच नव्हे तर इमारत बांधताना सीआरझेड नियमही धाब्यावर बसवण्यात आलेत.
उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती सापडलेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांचे अनेक कारनामे आता बाहेर येवू लागलेत. कृपांचा वांद्र्यातला साईप्रसाद बिल्डिंगमधील जो फ्लॅट सील करण्यात आलाय. आता तीच इमारत वादाच्या भोव-यात सापडलीये. या इमारतीचा दीड हजार चौरस मिटरचा भूखंड अगोदर इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी आरक्षित होता. २००० साली या भूखंडाचं आरक्षण उठवण्यात आलं आणि तो भूखंड साईप्रसाद हाऊसिंग सोसायटीला अवघ्या सव्वा कोटी रुपयांना विकण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे भूखंडाचा काही भाग रेल्वेच्या सेवन कॉरीडॉरमध्ये येत असतानाही इमारत बांधण्याची परवानगी देण्यात आली. तसचं सीआरझेड नियमांचाही भंग केल्याचा आरोप करण्यात य़ेत आहे.
साईप्रसाद इमारतीत एकट्या कृपाशंकर सिंहांचाच फ्लॅट आहे असं नाही. या इमारतीत तत्कालिन जिल्हाधिकारी संगीतराव यांची मुलगी, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव ए. के. जैन, मुंबई मनपाचे माजी आयुक्त स्वाधीन क्षत्रीय, जयराज फाटक, निवृत्त उपजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, किशोर गजभीये यांच्यासह पोलीस अधिकारी हिमांशू रॉय यांचाही फ्लॅट आहे. विरोधकांनी हे प्रकरण विधानसभेत उचलून धरण्याचा निर्धार केला आहे.
केद्रीय पर्यावरण मंत्रालयानं सीआरझेड नियमांच्या उल्लंघनप्रकरणात कारवाईचे आदेश दिले होते. मात्र ते आदेश पाळण्यात आले नाहीत. सरकार या प्रकरणावर काहीही बोलण्यास तयार नाही. या माहितीमुळं साईप्रसाद इमारत म्हणजे मुंबईतील आणखी एक आदर्श घोटाळा असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
व्हिडिओ पाहा...
[jwplayer mediaid="74525"]