www.24taas.com, मुंबई
पुणे आणि मुंबईतील बॉम्ब स्फोटानंतर योग्य ती खबरदारी घेण्यासाठी मुंबईसह राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, आमदार आणि खासदार निधीतून सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पश्चिम रेल्वे स्टेशनप्रमाणे आता मध्य रेल्वे स्टेशनवरही सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. सीएसटी , दादर , कुर्ला , कुर्ला टर्मिनस , ठाणे आणि कल्याण या सहा प्रमुख स्टेशनांवर ७८४ सीसीटीव्ही कॅमे ऱ्यांची कडवी नजर फिरणार असून ते पुरवणाऱ्या ' नेल्को ' कंपनीने जागांचा सर्व्हेही केला आहे . हे कॅमेरे बसवण्यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
रेल्वे स्टेशनवर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर स्टेशनांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला . त्यामुळे प्रमुख स्टेशनांवर ' इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम ' (आयएसएस ) कार्यान्वित करण्याची कल्पना मांडण्यात आलीय. स्टेशन बिल्डिंगमध्ये तसेच रेल्वे यार्डामध्येही सीसीटीव्ही असतील .
हे कॅमेरे ' रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन ' ( आरडीएसओ ) च्या दर्जाप्रमाणे असतील . शिवाय , डिजिटल असल्याने उत्तम दर्जाचे शूटिंग मिळवता येईल . सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह बॉम्बचा तपास करणारे बॅग स्कॅनर , गाड्यांची तपासणी करणारे स्कॅनरही दिमतीला असणार आहेत. त्यात ११ बॅग स्कॅनर , आठ गाड्यांचे स्कॅनर , दोन पोर्टेबल स्कॅनर , ८५ मेटल डोअर डिटेक्टर , ४२६ हँड मेटल डिटेक्टरचा समावेश आहे .
मुंबईत कुठे आणि किती असणार सीसीटीव्ही
सीएसटी - १३० कॅमेरे असून आता २१४ कॅमेरे लागतील .
दादर - ३१ ऐवजी १२० कॅमेरे
कुर्ला - ३२ कॅमेरे असून आता ४६ कॅमेरे
कुर्ला टर्मिनस - ३६ वरून थेट २०० कॅमेरे बसतील
ठाणे - ४० जागा ११४ कॅमेरे घेतील .
कल्याण - ५० ऐवजी ९० कॅमेरे असतील