www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिकेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्याची शक्यता असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केवळ २८ जागांवर यश मिळविता आले. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच नाराज असून त्यांनी वेळोवेळी दगा-फटका करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले होते. आता त्याची अंमलबजावण करत राज ठाकरे यांनी मुंबईत पराभव का झाला याची माहिती लेखी स्वरूपात देण्यास सांगितले आहे.
मनसे उमेदवार पडले यात कोणी राजकारण केले आणि कोणी विरोधकांचे काम केले, याची लेखी माहिती मागविली आहे. गेल्या दोन आठवड्यापासून प्रत्येक वॉर्डातील पदाधिकाऱ्यांच्या भेटून त्यांच्याकडून लेखी अहवाल स्वीकारणारे राज ठाकरे याच अहवालांच्या आधारे पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतून मनसेचे सहा आमदार निवडून आल्याने महापालिका निवडणुकीत पक्षाला चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात पक्षाला म्हणावे तेवढे यश मिळाले नाही. पराभवानंतर पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी कानोसा घेतला असता, इतर पक्षातील मित्रांना मदत करण्यासाठी पक्षविरोधी राजकारण झाल्याची माहिती राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे नेमकी परिस्थिती कळावी यासाठी विभागाध्यक्षापासून ते शाखाध्यक्षापर्यंत सर्वांकडून नेमके काय घडले, कोणी पक्षाचे काम केले नाही याची माहिती लेखी स्वरुपात देण्याचे आदेश राज यांनी दिले आहेत.
एकदा लेखी अहवाल दिल्यावर कोणालाही माघार घेता येणार नाही. त्याच्या विरोधात माहिती आहे, त्यालाही स्पष्ट शब्दांत स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांचे अहवाल स्वीकारण्याचे काम सुरू आहे.