www.24taas.com, मुंबई
आमदार दिलीप सानंदा सावकारी प्रकरणाचे भूत विलासरावांच्या मानगुटीवरुन उतरण्यास तयार नाही. सानंदा सावकारी प्रकरणात हस्तक्षेप केल्याप्रकरणी मुंबईतल्या स्थानिक न्यायालयानं विलासरावांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत, मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिसांना हे आदेश दिलेत.
मुंबईतल्या अब्दुल मलिक चौधरी यांनी विलासरावांविरोधात कोर्टात दावा दाखल केलाय. यावर सुनावणी करताना विलासरावांची सानंदा प्रकरणात काय भूमिका होती याची चौकशी करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. चौकशीचा अहवाल ११जून पर्यंत सादर करण्याचे निर्देश कोर्टानं पोलिसांना दिले आहेत.
सावकारी प्रकरणातून दिलीप सानंदा यांच्या कुटुंबीयांना वाचविण्यासाठी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा तसेच पोलिसांवर तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप विलासरावांवर आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विलासरावांवर कडक शब्दांत ताशेरे ओढत राज्य सरकारला दहा लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले होते.
सरकारनेही दंडाची रक्कम भरल्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढले होते. विलासरावांवर दंडात्मक कारवाई झालेली असली, तरी त्यांच्यावर फौजदारी कारवाईसाठी तक्रार दाखल करण्याची मुभा देण्यात आली होती. त्या पाश्र्वभूमीवर अब्दुल चौधरी यांनी मुंबईच्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडे खासगी तक्रार करून विलासराव, गोकुळचंद व दिलीप सानंदा या तिघांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्या तक्रारीच्या पाश्र्वभूमीवर न्यायालयाने मरिन ड्राइव्ह पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
आणखी संबंधित बातम्या
विलासराव देशमुख यांना कोर्टाचा दिलासा
विलासराव देशमुख सुप्रीम कोर्टात
व्हिडिओ पाहा....