www.24taas.com,मुंबई
पुण्यातील रस्त्यावर भाजी विक्रेत्याने वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण संस्थेत फ्लॅट घेतल्याची धक्कादायक माहिती चौकशी आयोगासमोर आली.
हा भाजीविक्रेता खडकी येथील कॅण्टॉन्मेंट भागातील बेकायदा झोपडीत राहतो. भाजी विक्रेत्यालाही आदर्शमध्ये फ्लॅट दिल्याचे स्पष्ट झाले आहे. आलिशान फ्लॅटसाठी आपण सोसायटीकडे तब्बल ६० लाख रुपये भरले असे ३४ वर्षीय विशाल केदारी यांने सांगितले. हे सांगताना त्याने ही रक्कम आपण आपल्या मित्रांकडून कर्ज घेतल्याची आयोगासमोर माहिती दिली.
मी एक भाजीविक्रेता आहे. तसेच फावल्या वेळेत सामाजिक कार्यही करतो. पुण्याच्या डिफेन्स इस्टेट कार्यालयात काम करणाऱ्या सेवक नय्यर यांच्याकडून आपल्याला आदर्शमधील फ्लॅटबाबतची माहिती समजली. त्यामुळे मी त्यांच्याकडे आदर्शमध्ये फ्लॅट घेण्याची इच्छा प्रदर्शित केली, असेही केदारी याने आयोगाचे वकील दीपन मर्चंट आणि ऍड. भरत झव्हेरी यांनी विचारलेल्या प्रश्नालला उत्तर देताना सांगितले.
आदर्शमधील फ्लॅटसाठी भरलेल्या ५९ लाख १० हजार रुपयांत आपला वाटा फक्त ३ लाख ५१ हजार रुपयांचा आहे. १० लाख रुपये आपला मित्र सुनील अडवाणी यांच्याकडून तर २० लाख रुपये हे सुनीलचा मित्र अजित थेपाडे या बिल्डरकडून घेतल्याचेही केदारी याने सांगितले. आदर्शमधील फ्लॅट मिळवून देणाऱ्या सेवक नय्यर यांनी केदारे याला फक्त तीन लाख रुपये कर्ज दिलेले असताना नय्यर यांच्या पत्नीकडून आपण २८ लाख रुपये कर्ज घेतल्याचे केदारी म्हणाला.
दरम्यान, आदर्शची इमारत ही लष्कराच्या सुरक्षिततेला धोकादायक आहे अथवा नाही या मुद्याकडे आपण आपले लक्ष केंद्रित केले नाही, असे अजब उत्तर माजी लष्करप्रमुख एन. सी. वीज यांनी आज आदर्श चौकशी आयोगासमोर दिले.