लढाई पूर्वीच आदित्य ठाकरेंची माघार

मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट्स कौन्सिल निवडणुकीतून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी माघार घेतलीय. निवडणुकीत लढण्यासाठी आमच्याकडे ब-यापैकी संख्याबळ आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 30, 2013, 07:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट्स कौन्सिल निवडणुकीतून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी माघार घेतलीय. निवडणुकीत लढण्यासाठी आमच्याकडे ब-यापैकी संख्याबळ आहे.
त्याच्या जोरावर आम्ही कुठल्याही पक्षाशी मैत्री करून युवा सेना आपला गड राखू शकते. मात्र तरीही राजकारणात आणि विद्यार्थी चळवळीत उडी घेताना समोर ठेवलेल्या आदर्शांची बूज राखण्यासाठी निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.
यासंदर्भात आदित्य ठाकरेंनी युवासैनिक आणि विद्यार्थ्यांना पत्र लिहिलंय.
काय हे त्या पत्रात
मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंटस् कौन्सिलच्या निवडणुकीच्या फंदात युवा सेनेने पडता कामा नये, असा निर्णय मी राजकारणात आणि विद्यार्थी चळवळीत उडी घेताना समोर ठेवलेल्या आदर्शांची बूज राखण्यासाठी आणि पूर्ण विचारांती घेतला आहे.
आमच्याकडे बर्यासपैकी संख्याबळ आहे. त्याच्या जोरावर कोणत्याही पक्षाशी मैत्री करून युवा सेना आपला गड सहज राखू शकते. तरीही...
१) मी ‘युवा सेना’ सिनेटच्या निवडणुकीत स्वबळावरच उतरवली होती. बाहेरून कोणाचीही मदत न घेता ती जिंकण्याचा करिष्माही करून दाखवला. राजकीय फायद्यासाठी विरोधकांशी हातमिळवणी कदापि करायची नाही, ही माझी आजोबा आणि वडिलांची शिकवण आहे.
२) माझी फोरममधील काही ‘जीएस’शी चर्चा झाली. ते प्रचंड ताणतणावाखाली असल्याचे प्रकर्षाने जाणवले. थेट दिल्लीहून येणारे फोन, दाखवली जाणारी प्रलोभने, दिल्या जाणार्याु धमक्यांनी ते त्रस्त आहेत. विद्यार्थी चळवळीत मला हे मुळीच अपेक्षित आणि मान्य नाही.
राजकीय पक्षांतर्फे ‘जीएस’चे अपहरण होणे, त्यांना कुटुंबापासून दूर अज्ञात स्थळी ओलीस धरण्याचे प्रकार घडतात. मी स्वत: त्याच वयाचा असून युवा संघटनेचे नेतृत्व करत आहे. ‘जीएस’च्या बाबतीत घडणार्याच या गैरप्रकारांचा साक्षीदार वा धनी मी होऊ इच्छित नाही. विद्यार्थी हा शिक्षण, मित्र, कुटुंब यांच्यापासून कदापि तोडला जाऊ नये अशी माझी ठाम भूमिका आहे.
या भूमिकेची जपणूक करण्यासाठी स्टुडंट्स कौन्सिलच्या निवडणुकीपासून अलिप्त राहिल्याने फारसे काही बिघडत नाही. आपली युवा सेना एकीकडे फार मोलाचे काम करते आहे. बँक भरतीच्या परीक्षा, केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा, विद्यार्थ्यांच्या मागण्या, खेळ, महिलांची सुरक्षितता अशा अनेक आघाड्यांवर आपण कार्यरत आहोत. मग आपला दुसरा हात शेणात घालायचा कशाला?
विशेष म्हणजे, निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींकडे ना अधिकार असतात ना बोलण्यासाठी वेळ असतो. त्यांच्याकडून कुठलेही परिवर्तन घडू शकत नाही.
उत्तम दर्जाची शिक्षण व्यवस्था हे माझे स्वप्न आणि ध्यास आहे. हे लक्ष्य कठोर परिश्रमांच्या जोरावर आणि २०१४मध्ये एनडीएचे सरकार आणून आपण निश्‍चितपणे गाठू शकतो.
जे सध्या निवडून आलेले आहेत त्यांच्यावर मी कोणताही दबाव आणणार नाही. पण कॉलेजातील निवडणुकीनंतर त्यांना करीयरच्या बाबतीत इतर विद्यार्थ्यांप्रमाणे कोणतीही मदत लागल्यास मी सदैव उपलब्ध असेन.
१४ विद्यार्थी मतदारांना त्यांच्यातून उच्च पदासाठी एकाला निर्भयपणे आणि मुक्तपणे निवडून द्यावा, असे माझे इतर राजकीय पक्षांना आवाहन आहे. या निवडणुकीत सकारात्मकता आणण्याचा प्रारंभ युवा सेनेने आपल्या परीने केला आहे. सारे पक्ष याचे अनुकरण करतील अशी आशा मला आहे. त्यांना चांगल्या कामासाठी ‘युवा सेना’ नेहमीच पाठिंबा देईल.
त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. माझ्या भूमिकेशी युवा सैनिक, मित्र आणि हितचिंतक सहमत होतील असा विश्वाेस वाटतो.
अभिलाषेपेक्षा सदसद्विवेक आणि अहंकारापेक्षा नीतिमूल्ये महत्त्वाची हा माझ्या आजोबांनी, वडिलांनी घालून दिलेला मार्ग मी स्वीकारला आहे.
जय हिंद! जय महाराष्ट्र! वंदे मातरम् !!
आपला नम्र
आदित्य ठाकरे
युवा सेनाप्रमुख

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.